देवेश गोंडाणे
नागपूर : महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेमधील (महाज्योती) कोटय़वधींच्या ‘टॅबलेट’ घोटाळय़ामुळे राज्यभर खळबळ उडाल्यानंतर आता हे टॅबलेट मूळ उपकरण निर्मात्याकडून तपासण्यात आले नसल्याचा उल्लेख माहिती अधिकारात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे निकृष्ट टॅबलेट विद्यार्थ्यांना देण्यात आल्याचा संशय असून विद्यार्थ्यांचे बहुतांश टॅबलेट निकामी झाल्याची माहिती हाती आल्याने हा संशय बळकट होत चालला आहे.
‘महाज्योती’कडून ‘एमपीएससी’ आणि ‘यूपीएससीसह’ ‘जेईई’, नीट’ आदी परीक्षांचे प्रशिक्षण घेणाऱ्या सहा हजार विद्यार्थ्यांना ‘लेनोवो टॅबलेट’ देण्यात आले. विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट देण्याचा निर्णय ‘महाज्योती’ने पहिल्यांदाच घेतल्याने या योजनेचे कौतुक झाले. मात्र, या टॅबलेटच्या नावावर महाज्योतीने १० ते ११ हजार रुपये प्रति ‘टॅबलेट’ बाजारमूल्य असलेले ६ हजार ‘लेनोवो टॅबलेट’ प्रति १८ हजार ८९९ रुपयांना विकत घेऊन ४ कोटी ८० लाखांचा भ्रष्टाचार केल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने प्रसिद्ध केल्यानंतर प्रशासनावर चौफेर टीका होत आहे. महाज्योतीने सरकारी ई-मार्केटप्लेस (जेईएम) या संकेतस्थळावर ई-निविदा प्रक्रिया राबवून टॅबलेट विकत घेतले. मात्र, माहिती अधिकारातील उल्लेखानुसार, हे टॅबलेट मूळ उपकरणे निर्मात्याकडून तपासण्यातच आलेले नाहीत. इतक्या मोठय़ा संख्येने टॅबलेट विकत घेताना ते मूळ उपकरण निर्मात्याकडून तपासण्यात न आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
काही महिन्यांतच बंद पडले
टॅबलेट घोटाळय़ाच्या ‘लोकसत्ता’च्या वृत्तानंतर काही विद्यार्थ्यांनी संपर्क करत त्यांचे टॅबलेट काही महिन्यातच बंद पडल्याची तक्रार केली. त्यामुळे महाज्योतीने विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे टॅबलेट दिल्याचा आरोपही विद्यार्थी करीत आहेत. प्रशासनाने केवळ महागडे टॅबलेट घेतल्याचा देखावा केल्याचा संशय विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे.
पुन्हा मोठी खरेदी होणार
‘महाज्योती’ पुन्हा नव्याने बारा हजार टॅबलेट खरेदी करणार आहे. हे टॅबलेट विद्यार्थ्यांना वितरित केले जाणार आहेत. यावेळी टॅबलेटची संख्या जास्त असल्याने पुन्हा यामध्ये गोंधळ होण्याची शक्यता काही संघटनांनी उपस्थित केली आहे. याआधी सहा हजार टॅबलेटमध्ये ४ कोटींहून अधिक रुपयांचा गैरप्रकार झाला होता. त्यात पुन्हा बाजारमूल्यापेक्षा अधिक रुपयांना बारा हजार टॅबलेट खरेदी करणार का, असा प्रश्नही काहींनी उपस्थित केला आहे.
टॅबलेट खरेदीमध्ये कुठलाही भ्रष्टाचार झालेला नाही. केंद्र सरकारच्या संकेतस्थळावर असलेल्या सर्व अटी, शर्ती तपासूनच खरेदी करण्यात आली. त्यामुळे यावर आक्षेप घेणे चुकीचे आहे.
– डॉ. बबनराव तायवाडे, माजी संचालक, महाज्योती.