नागपूर : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) कार्डियाक ॲनेस्थेसिया तज्ज्ञ एक महिन्याच्या सुट्टीवर गेल्याने पंधरा दिवसांपासून हृदयाच्या बायपास शस्त्रक्रिया खोळंबल्या आहेत. भूलतज्ज्ञाने एक महिन्यापूर्वी एम्स प्रशासनाकडे सुट्टीचा अर्ज केला होता. तरीही प्रशासनाने कोणतीही पर्यायी व्यवस्था केली नाही. परिणामी, पंधरा दिवसांपासून एम्समध्ये एकही बायपास शस्त्रक्रिया झाली नाही. अनेक गरीब रुग्ण सुपरस्पेशालिटी आणि एम्स या दोन्ही रुग्णालयांच्या हृदय शल्यक्रियाशास्त्र विभागात बायपासच्या प्रतीक्षेत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एम्समध्ये एमडी भूलरोग तज्ज्ञांची संख्या २५ हून अधिक आहे. त्यात एका कार्डियाक ॲनेस्थेसिया तज्ज्ञाचा समावेश आहे. बायपासदरम्यान डॉक्टरच्या मदतीला बरेच वरिष्ठ भूलतज्ज्ञ असतात. त्यामुळे कुणी सुट्टीवर गेल्यावर एखाद्या वरिष्ठ डॉक्टरला भूलतज्ज्ञ म्हणून तयार का केले नाही वा इतर पर्यायी भूलतज्ज्ञांची सोय का केली नाही, हा प्रश्न अनुत्तरित आहे. एम्समध्ये सध्या सुमारे तीन हृदय शल्यचिकित्सक व त्यांच्या अखत्यारित काम करणारे तीन वरिष्ठ निवासी डॉक्टर केवळ बाह्यरुग्ण सेवाच देत असल्याची सूत्रांची माहिती आहे.

हेही वाचा – कारागृहातील कैद्यांनी फुलवली कोट्यवधीची शेती, तब्बल साडेचार कोटींचे उत्पादन

भूलतज्ज्ञ सुट्टीवर गेल्याने बायपास शस्त्रक्रिया थांबणे चुकीचे आहे. याबाबत ‘लोकसत्ता’कडून माहिती प्राप्त झाल्यावर तातडीने प्रशासनाला पर्यायी व्यवस्था करायला सांगितले आहे. – डॉ. विकास महात्मे, अध्यक्ष, एम्स, नागपूर.

देशात एनएबीएच मानांकन प्राप्त करणारी पहिली संस्था

नागपूर एम्स हे ‘नॅशनल अ‍ॅक्रिडेशन बोर्ड फॉर हॉस्पिटल्स अ‍ॅण्ड हेल्थकेअर प्रोव्हायडर्स’चे (एनएबीएच) मानाकंन प्राप्त करणारे देशातील पहिले एम्स रुग्णालय ठरले आहे. या कार्याची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेऊन ‘एम्स’ नागपूरच्या चमूचे अभिनंदन केले होते.

हेही वाचा – शाहिद शरीफने पोलिसांना मामा बनवले….मुद्दाम जुने पारपत्र….

नागपूर एम्सचा प्रवास

नागपूर ‘एम्स’ला २०१८ पासून सुरुवात झाली. सप्टेंबर २०१९ पासून बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) तर फेब्रुवारी २०२० पासून आकस्मिक विभागासह वॉर्ड रुग्णसेवेत सुरू झाले. या पाच वर्षांमध्ये ‘एम्स’मध्ये ३८ हून जास्त विभाग सुरू झाले. सध्या येथे १८ हून अधिक वॉर्ड तर २३ हून अधिक सुसज्ज अशी शस्त्रक्रिया गृह आहेत. रोजची ओपीडीची संख्या वाढून अडीच हजारांवर गेली. अनेक गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांसोबतच नुकतेच बोनमॅरो ट्रान्सप्लांट, किडनी प्रत्यारोपण सुरू झाल्याने मध्य भारतातील नागरिकांसाठी हे रुग्णालय आशेचे केंद्र ठरले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bypass surgery stalled in nagpur aiims anesthesiologist on leave mnb 82 ssb