लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गडचिरोली : जिल्ह्यातील भामरागड आणि छत्तीसगड सीमेवर झालेल्या चकमकीत गडचिरोली पोलिसांच्या नक्षलविरोधी पथक सी ६० दलातील एक जवान शहीद झाला. आज, मंगळवारी दिरंगी-फुलणार जंगल परिसरात ही चकमक झाली. महेश नागुलवार (३९, रा. अनखोडा) असे शहीद जवानाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्तीसगड सीमेला लागून असलेल्या भामरागड तालुक्यातील दिरंगी आणि फुलणार या गावांतील जंगल परिसरात गेल्या काही दिवसांपासून नक्षलवाद्यांनी तळ ठोकला होता. ही माहिती प्राप्त होताच गडचिरोली पोलिसांचे नक्षलविरोधी सी ६० चे १८ पथक आणि सीआरपीएफच्या दोन पथकाच्या जवानांनी १० जानेवारीला या परिसरात नक्षलविरोधी मोहीम राबवली होती. आज या परिसराला जवानांनी घेराव घातला असता लपून बसलेल्या नक्षलवाद्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार केला. यावेळी जवानांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. चकमकीदरम्यान गडचिरोली सी ६० पथकाचा जवान महेश नागुलवार याला गोळी लागली. हेलिकॉप्टरने उपाचारासाठी नेण्यात येत असताना त्यांची प्राणज्योत मालवली.

चकमकीच्यावेळी २५ ते ३० नक्षलवादी तेथे उपास्थित असल्याची माहिती असून यात नक्षल नेता रघुसह काही मोठे कमांडर होते. चकमक परिसर घनदाट जंगलाने वेढलेला असल्याने जवानांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत नक्षलवाद्यांशी लढा दिला. गेल्या चार वर्षात गडचिरोली पोलिसांनी केलेल्या आक्रमक कारवायांमुळे नक्षलवादी चळवळ खिळखिळी झाली होती. चार वर्षात एकही जवान शहीद झालेला नव्हता.

दोन मुलींचे पितृछत्र हरवले

चामोर्शी तालुक्यातील अनखोडा गावातील रहिवासी असलेला शहीद जवान महेश नागुलवार २०१२ मध्ये पोलीस दलात भरती झाले होता. वर्षभरापूर्वी महेशने गडचिरोली शहरात घर बांधले होते. त्याची पत्नी राज्य परिवहन महामंडळात नोकरीला असून त्यांना दोन मुली आहेत. महेशच्या निधनामुळे मुलींचे पितृछत्र हरविले असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

पोलिसांच्या आक्रमक कारवायांमुळे नक्षल्यांची कोंडी

मागील काही वर्षांपासून छत्तीसगड आणि गडचिरोली पोलिसांनी केलेल्या आक्रमक कारवायांमुळे नक्षलवाद्यांची मोठी कोंडी झालेली आहे. दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र सीमेवरील बिजापूर जिल्ह्यात झालेल्या चकमकीत छत्तीसगड पोलिसांनी ३१ नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले होते. यात दोन जवानही शहीद झाले. त्यामुळे महाराष्ट्र सीमाभागात नक्षल्यांचा वावर वाढला आहे. डोंगराळ आणि घनदाट जंगलामुळे कोपर्शी, फुलणार भागात नक्षलवाद्यांच्या हालचाली वाढल्याने गडचिरोली पोलिसांनी ही मोहीम हाती घेतली होती.