अकोला : कृषी पदवीधरांवर शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याची मोठी जबाबदारी आहे. विकसित कृषी क्षेत्रासाठी शिक्षण, नवतंत्रज्ञान, संशोधन याची सांगड घालून एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे, असे मत राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांनी आज येथे व्यक्त केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ३९ व्या दीक्षांत समारंभाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. प्रतिकुलपती तथा राज्याचे कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर, कर्नाटक कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष डॉ. अशोक दलवाई, कुलगुरू डॉ. शरद गडाख, वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्रमणी, कुलसचिव डॉ. सतीश ठाकरे यांच्यासह कार्यकारी, विद्वत परिषदेचे सदस्य व्यासपीठावर उपस्थित होते.

राज्यपाल पुढे म्हणाले, ज्ञान मिळवणे ही सातत्यपूर्ण प्रक्रिया आहे. देशाच्या कृषी क्षेत्राला अधिकाधिक प्रगत करण्याची जबाबदारी नवपदवीधरांना पार पाडावी लागेल. कृषी विद्यापीठाने बीजनिर्मिती, पशुधन विकास, आदर्श ग्राम प्रकल्प आदी उपक्रमांबरोबरच शैक्षणिक विकास केला. विद्यापीठातून घेतलेले शिक्षण आता शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचवण्याचे कार्य पदवीधरांनी करावे.

ज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात भारताने जागतिकस्तरावर मोठी झेप घेतली. औद्योगिक क्षेत्राबरोबरच कृषी क्षेत्रातही देशाने उल्लेखनीय प्रगती केली. त्यामध्ये महाराष्ट्र राज्य देशात अग्रेसर आहे. विद्यार्थ्यांनी आता ज्ञान प्राप्ती केल्यानंतर निश्चित ध्येय ठरवून वाटचाल करावी, असे आवाहन राज्यपालांनी केले.

वातावरणातील बदलानुसार कृषी क्षेत्रातही व्यापक बदल घडवणे आवश्यक आहे. शेतीतील उत्पादन खर्च कमी करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढ होण्यासाठी नवतंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे. ‘एआय’सारख्या नवतंत्रज्ञानाचा वापर शेतीसाठी व्हावा. रासायनिक शेतीमुळे आरोग्य धोक्यात आले. त्यामुळे सेंद्रिय शेतीकडे वळणे आवश्यक आहे, असे कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी सांगितले.

शाश्वत विकासासाठी कृषी उत्पादन प्रणालीची पुनर्रचना करतानाच कृषी पर्यावरणशास्त्र आणि सेंद्रिय शेतीवर भर देण्याची गरज डॉ. अशोक दलवाई यांनी दीक्षांत भाषणात व्यक्त केली. जैवविविधतेची जपणूक, विषमुक्त व सुरक्षित अन्ननिर्मिती, मृद संवर्धन, जलसंवर्धन होणे आवश्यक आहे. त्यामुळे कृषी पर्यावरण व सेंद्रिय शेतीशास्त्र डोळ्यांसमोर ठेवून त्या दृष्टितूनच कृषी संशोधन केले पाहिजे.

एकविसाव्या शतकातील संशोधनाची दिशा पर्यावरण संवर्धक असावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी प्रास्ताविकात विद्यापीठाच्या कामगिरीची सविस्तर माहिती दिली. या समारंभात तीन हजार ३६० विद्यार्थ्यांना स्नातक, स्नातकोत्तर व आचार्य पदवी प्रदान करण्यात आली.