नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा शपथविधी काही तासावर आला असताना रविवारी सकाळपर्यंत संभाव्य मंत्र्यांची नावे जाहीर करण्यात आली नव्हती. त्यामुळे भाजप व मित्र पक्षाच्या नेत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. अखेर सकाळी १० वाजता संभाव्य मंत्र्यांना फोनव्दारे शपथविधीसाठी तयार राहा, असे निरोप देण्यात आले. त्यामुळे इच्छुकांचा जीव भांड्यात पडला. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रवींद्र चव्हाण आणि सुधीर मुनगंटीवार या शिंदे मंत्रीमंडळातील भाजपच्या दोन मंत्र्यांची नावे नव्या मंत्रिमंडळाच्या यादीत नाहीत, वर्धेचे भाजप आमदार पंकज भोयर यांना संधी मिळणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रविवारी नागपूरमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. दुपारी ४ वाजता राजभवनावर होणाऱ्या या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू आहे. एकीकडे शपथविधीची तयारी सुरू असताना दुसरीकडे मंत्री कोण होणार यांची नावे गुलदस्त्यात होती. विशेषत: विदर्भात शपथविधी आहे. या भागात भाजपचे अनेक प्रबळ दावेदार आहेत. मात्र नावे जाहीर न झाल्याने ते सर्व अस्वस्थ झाले होते. शिवसेना शिंदे व राष्ट्रवादी अजित पवार या गटातील इच्छुकांची अवस्था यापेक्षा वेगळी नव्हती.

हेही वाचा – जिल्हा नियोजन अधिकाऱ्याची कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, गडचिरोलीत चाललेय तरी काय?

खुद्द नागपूरचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले असले तरी जिल्ह्यातील दुसरे नाव कुठले याबाबत शपथविधी काही तासांवर आला तरी तर्कवितर्कच लावणे सुरू आहे. भाजपमध्ये याबाबत कोणी जाहीरपणे बोलण्याची हिंमत करीत नसले तरी नेत्यांमध्ये संताप होता. पक्षश्रेष्ठींची संमती मिळायची आहे या नावाखाली जाणून नावे जाहीर केली जात नाहीत. यादीला विलंब होणे याचाच अर्थ मंत्रिमंडळाची यादी तयार करताना उलटफेर होणे याचे संकेत आहेत. पक्षांतर्गत विरोधकांना डावलण्यात येणार व समर्थकांची वर्णी लावण्याची ही खेळी आहे, असे भाजपच्या पश्चिम विदर्भातील नेत्याने सांगितले होते. मात्र सकाळी ९ पासून संभाव्य मंत्र्यांना फोनव्दारे शपथविधीसाठी या असे कळविण्यात आले. भाजपमधील काही ज्येष्ठ मंत्र्यांचा सामावेश केला जाणार नाही. त्याऐवजी नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाईल, असे समजते.

भाजपच्या यादीबाबत मुख्यमंत्री फडणवीस हे केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करून नावे अंतिम करणार आहेत. राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्र्यांकडे नावे पाठविण्यात आली आहेत. रविवारी सकाळी भाजपच्या गोटातून जी संभाव्य उमेदवारांची नावे जाहीर झाली त्यात विदर्भातील भाजपचे ज्येष्ठ नेते व शिंदे मंत्रीमंडळातील सदस्य वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा समावेश नव्हता, त्याचबरोबर भाजपचे रवींद्र चव्हाण यांचे नाव नव्हते. त्यांच्याऐवजी वर्धेचे आमदार पंकज भोयर यांच्यासह अन्य काही नवीन चेहऱ्यांचा समावेश आहे.

शपथविधीची तयारी

प्रशासनाने नागपूरच्या राजभवनमध्ये शपथविधीची सारी तयारी केली आहे. रविवारी दुपारी ४ वाजता शपथविधी पार पडेल, असे राजभवनाच्या सूत्राकडून सांगण्यात आले. २० ते २५ मंत्र्यांचा समावेश केला जाईल, अशी शक्यता वर्तविण्यात आहे.

हेही वाचा – Maharashtra Cabinet Expansion : “…पण, आतापर्यंत फोन आला नाही”, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत शिवेंद्रराजेंनी काय सांगितले?

सर्वाधिक रस्सीखेच शिवसेनेत

मंत्रिमंडळात आपला समावेश व्हावा यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी शिवसेनेचे इच्छुक जमले होते. प्रत्येकाला पहिल्या टप्प्यात मंत्रीपदाची इच्छा असल्याने शिंदे यांच्यापुढे पेच निर्माण झाला आहे. यातूनच शिंदे यांनी फिरती म्हणजेच अडीच – अडीच वर्षे मंत्रीपदे वाटून देण्याचा तोडगा काढला आहे.

संभाव्य नावे

भाजपची संभाव्य नावे

चंद्रकांत पाटील, नितेश राणे, चंद्रशेखर बावनकुळे, मंगलप्रभात लोढा, पंकज भोयर, जयकुमार गोरे, आकाश फुंडकर, पंकजा मुंडे, शिवेंद्रराजे भोसले, गिरीश महाजन, जयकुमार रावल, मेघना बोर्डीकर

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cabinet expansion nagpur winter session rest to ravindra chavan sudhir mungantiwar an opportunity for pankaj bhoyar of wardha maharashtra cabinet expansion bjp ministers cwb 76 ssb