भंडारा : “तुमच्या पत्नीने कोतवाल भरती परीक्षा दिली होती ना, निकाल लागायला अजून वेळ आहे, गजभिये बाई तुमच्या पुढे आहेत, तुमचं नाव पुढे करायचं का? किती देता लवकर सांगा,” असा एका एजंटचा कॉल तुमसर तालुक्यातील एका महिला परीक्षार्थीच्या नवऱ्याला आला. हा अज्ञात एजंट कोण ? याचा मुख्य सूत्रधार कोण? तालुक्यात आणि जिल्ह्यात अशाप्रकारे आर्थिक व्यवहारातून किती जणांची नियुक्ती करण्यात आली, असे अनेक प्रश्न आता या निमित्ताने उपस्थित झाले आहेत.
भंडारा तालुक्यात कोतवाल भरती प्रकरणात चौघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याचे प्रकरण दोन दिवसांपूर्वीच उघड झाले असताना या ऑडियो क्लिपने खळबळ उडाली आहे. कोतवाल भरती परीक्षेच्या निकालात नाव पुढे करून देण्याचे आमिष देत या अज्ञात व्यक्तीकडून पैशांची मागणी करण्यात आल्याचे ध्वनिफितीवरून स्पष्ट होत असून, आर्थिक गैर व्यवहाराचा पुरावा असलेली ही ध्वनिफीत ‘लोकसत्ता’च्या हाती लागली आहे.
तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी येथील विपुल दहाट यांना कोतवाल भरती परीक्षेच्या संदर्भात एका अज्ञात एजंटकडून कॉल आला होता. दहाट यांची पत्नी कोमल हिने कोतवाल भरती परीक्षा दिल्याची माहिती या एजंटने काढली आणि दहाट यांच्या गावातीलच अमित ढोमने नामक व्यक्तीच्या मोबाईलवरून दहाट यांच्याशी पहिल्यांदा संपर्क साधला. त्यानंतर निकालाच्या दिवशी या अज्ञात एजंटने दहाट यांना पुन्हा कॉल केला आणि आपण अमितच्या मोबईलवरून बोलल्याची आठवण करून दिली. त्यानंतर त्याने मूळ मुद्द्यावर येत दहाट यांना कसे करायचे? असे विचारले. “गजभिये बाई तुमच्या पुढे आहे, पण निकाल लागायला वेळ आहे त्यामुळे तुम्ही म्हणत असाल तर तुमचे नाव पुढे करता येईल” असे या अज्ञात व्यक्तीने सांगितले. त्यावर दहाट यांनी “माझ्याकडे तेवढे पैसे नाहीत, नंतर बघू,” अशी टाळाटाळ सुरू केली असता, “आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्ह्यात आहेत त्यामुळे निकाल जाहीर करायला वेळ लागेल, अजूनही वेळ आहे तुम्ही म्हणत असाल तर तुमचे नाव पुढे करतो, अमितकडे तुमचे ओरिजनल डॉक्युमेंट द्या फक्त, बाकी निकाल लागल्यावर बघू… लवकर सांगा,” असे ही अज्ञात व्यक्ती म्हणत आहे.
या अज्ञात व्यक्तीचे नाव ट्रू-कॉलरवर सुनील ए असे दाखवत आहे. मात्र आता हा नंबर संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहे. या एजंटचा म्होरक्या कोण ? आणि आतापर्यंत किती जणांकडून याने पैसे घेऊन नियुक्ती केली? असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत. मात्र या मागे एक मोठी लॉबी असल्याचे तसेच शासकीय अधिकाऱ्यांचे हात रंगले असल्याची चर्चा आहे.
हेही वाचा – अमरावती: चिखलदरा SKY WALK उभारणीचा मार्ग मोकळा; पावसाळ्यानंतर सुरू होणार काम
एआयएसएफचे राज्य सचिव वैभव चोपकर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांना भेटून ही ध्वनिफीत ऐकवली असता सदर अज्ञात व्यक्तीच्या विरोधात तक्रार नोंदविण्याचा सल्ला त्यांनी दिल्याचे वैभव यांनी सांगितले. कोतवाल भरती तसेच पोलीस पाटील भरती परीक्षा आणि नियुक्ती यात तुमसर व मोहाडी तालुक्यातही प्रचंड आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप करीत विविध मागण्यांचे निवेदन चोपकर यांनी जिल्हाधिकारी तसेच उपविभागीय अधिकारी तुमसर यांच्याकडे दिले आहे. मात्र प्रशासन यावर जाणीवपूर्वक पांघरून घालत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. उल्लेखनीय आहे की, कोतवाल, पोलीस पाटील भरती परीक्षा आणि नियुक्ती २०२४ मध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याने पुर्नपरिक्षा आणि पुर्ननियुक्तीची मागणी सर्वच तालुक्यांमध्ये विविध सामाजिक संघटनांनी लावून धरली आहे.