लोकसत्ता टीम

नागपूर : भारताच्या मध्यभागी… महाराष्ट्राच्या हद्दीत आणि जागतिक पर्यटन नकाशावर नाव कोरलेला व्याघ्रप्रकल्प म्हणजे ताडोबा-अंधारी. या जंगलात निसर्गाचे चमत्कार बघायला मिळतात आणि त्यातलाच एक म्हणजे जगप्रसिद्ध ताडोबाचा वाघ. इथल्या वाघांनी लोकांना वेड लावले आहे, इथल्या वाघांनी इतिहास रचले आहेत आणि तोच वारसा त्यांची नवी पिढी समोर नेत आहे.

व्याघ्रपर्यटनाला पावसाळी सुट्या लागल्या असल्या तरी जिथे डांबरी रस्ते आहेत त्या मार्गावर व्याघ्रपर्यटनाची मुभा पर्यटकांना देण्यात आली आहे. मोसमी पावसाने ताडोबाच्या जंगलात सर्वदूर हिरवळ पसरली आहे आणि त्यावर ताडोबाची सम्राज्ञी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या “कुवानी” या वाघिणीचे बछडे निसर्गाचा निर्विवाद आनंद लुटत आहेत. वन्यजीव छायाचित्रकार प्रियदर्शन गजभिये यांनी हा क्षण त्यांच्या कॅमेऱ्यात अलगदपणे टिपला आहे.

आणखी वाचा-चंद्रपूर : विधानसभेची एक जागा द्या, अन्यथा सामूहिक राजीनामे; ‘या’ पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा इशारा

ताडोबाची सकाळ म्हणजे पक्षांच्या किलबिलाटाने आणि अप्रतिम निसर्गसौन्दर्याने बहरलेली. त्यामुळे अशा या वातावरणात “कुवानी” आणि तिच्या बचड्यांच्या भेटीची अपेक्षा न ठेवणे म्हणजे चूकच. ताडोबाची ही वाघीण, तिची जंगलावर असलेली कमांड पाहणे म्हणजे आयुष्यभरासाठी आठवण. अशा पावसाळी सकाळी तिचा तिच्या बछड्यासह असलेला जंगलातील वावर डोळ्यांचे पारणे फेडणारा. ताडोबात प्रवेश केला तर झरी प्रवेशद्वारातून समोर गेल्यावर हमखास ती दर्शन देते. बांबूच्या रांजीमागे ‘कुवानी’ वाघीण आपल्या बच्च्यांसह उभी असते, पण पर्यटकांना पाहूनही न पाहल्यासारखे करत ती तिथेच अंगावर कोवळे ऊन घेत आडवी होते. पहिल्यांदाच येणाऱ्या पर्यटकाला अंदाजही येणार नाही इतकी ती निसर्गाशी एकरुप होते. मध्येच तिचे बछडे तिच्या अंगाखांद्यावर खेळत असतात.

आणखी वाचा-राज्यातील शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षकांचे नियुक्ती आदेशही शासनच काढणार

झरीतील ‘कुवानी’ या क्षेत्रातील एक ज्येष्ठ, धैर्यशील वाघीण म्हणून ओळखली जाते. २०११ साली ताडोबाच्या गाभा क्षेत्रात “कुवानी”चा जन्म झाला. अल्पावधीतच तिने या जंगलावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. कोळसाच्या जंगलात फिरणाऱ्यांना कुवानी माहिती नाही असे होणार नाही. ती उत्कृष्ट आई आहे आणि अत्यंत काळजीपूर्वक पिलांना वाढवते. त्यांचे संगोपन करते. ती सहाव्यांदा आई झाली आहे आणि जवळजवळ दहा महिन्याहून अधिक वयाची तीची बछडे आहेत. याच बचड्यांनी निसर्गाचा मनमुराद आनंद लुटला आणि पावसाळी पर्यटनाच्या पहिल्याच दिवशी पर्यटकांना खूश केले. मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या “कुवानी” थकली आहे, पण तिचा दरारा अजूनही कायम आहे.

सुरुवातीच्या काळात नवीन आलेल्या नर वाघाने ‘कुवानी’च्या दोन बछड्यांचा बळी घेतला होता आणि तिच्या दुसऱ्या दोन बछड्यांवर त्याचा आघात झाला होता. म्हणूनच ती ‘कुवानी’ला सोडत नव्हती. तो मानसिक आघात आजही तिच्यावर जाणवतो, पण तिचा दरारा मात्र अजूनही कायम आहे. ती एक उत्कृष्ट आई आहे. वन्यजीवप्रेमींना कायम खुश केले. पर्यटक वाहनांची पर्वा न करता ही रस्त्यावरुन चालते. हाच वारसा तिचे बछडेदेखील पुढे नेत आहेत.