राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विधिसभेतील शिक्षक, प्राचार्य, संस्थाचालक प्रवर्गातील निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात आहे. रविवारी २० नोव्हेंबरला यासाठी निवडणुका होणार आहेत. शिक्षक प्रवर्गातून ‘नुटा’ संघटनेने दहाही जागांवर उमेदवार उभे केले असून वैयक्तिक भेटीवर जोर दिला जात आहे. तर संस्थाचालक गटातून पहिल्यांदाच जे.डी. अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सचिव अजय अग्रवाल रिंगणात उतरले आहेत.
विद्यापीठ विधिसभा, विद्वत परिषद व अभ्यासमंडळ निवडणूक २० नोव्हेंबर रोजी होणार आहे. त्यासाठी शासकीय विज्ञान संस्था, नागपूर येथे मतदान केंद्र देण्यात आले होते. मात्र, आता त्यात बदल करण्यात आला आहे. हिस्लॉप महाविद्यालयात आता हे मतदान केंद्र राहणार आहे. केवळ, २० नोव्हेंबरच्या निवडणुकीसाठी हा बदल करण्यात आला असल्याचे विद्यापीठाने कळवले आहे. या निवडणुकीमध्ये शिक्षण मंच, महाआघाडी आणि नुटामध्ये थेट लढता पाहायला मिळणार आहे. निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून यंदा सर्वच संघटना वैयक्तिक प्रचारावर भर देताना दिसत आहेत.
शिक्षक प्रवर्गात ‘नुटा’चे दहा उमेदवार
प्राध्यापक संघटनांमध्ये प्रामुख्याने काम करणाऱ्या नुटा संघटनेच्या वतीने यंदा शिक्षक प्रवर्गात दहा जागांवर उमेदवार उभे करण्यात आले आहेत. या उमेदवारांना विजयी करण्यासाठी नुटाने कंबर कसली असून प्रत्येक प्राध्यापकांची भेट घेण्यावर भर दिला आहे. नुटाने अभियांत्रिकी प्राध्यापकांच्या वेतनाचा प्रश्नाला वाचा फोडली होती. त्यामुळे शिक्षक प्रवर्गात नुटाचा जोर अधिक असल्याची चर्चा आहे.
संस्थाचालक गटात अजय अग्रवाल रिंगणात
संस्थाचालकांच्या गटातून परंपरागत लोकांना धक्का देण्यासाठी पहिल्यांदाच जे.डी. अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सचिव अजय अग्रवाल उभे आहेत. संस्थाचालकांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी निवडणुकीमध्ये उतरलो असून एकदा संधी द्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. या गटातूनही अनेक दिग्गज उमेदवार असल्यामुळे येथेही चांगली लढत राहणार आहे.