नागपूर : आंतरराष्ट्रीय स्तरावर न्यायाचे प्रतीक समजल्या जाणाऱ्या रोमन न्यायदेवीचे चित्र बदलून त्या ठिकाणी भारतीय न्यायदेवतेचे चित्र यावे, यासाठी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष मोहीम सुरू केली आहे. बार कौन्सिलच्या वतीने सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना न्यायदेवतेचे संकल्पचित्र भेट देऊन या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.
भारतीय न्यायालयांमध्ये डोळय़ावर काळी पट्टी बांधलेल्या न्यायदेवीची प्रतिमा वापरली जाते. ही प्रतिमा रोमन देवी जस्टीशियाची आहे. या न्यायदेवीच्या एका हातात तलवार तर दुसऱ्या हातात तराजू आहे. तलवार आणि तराजू संतुलित न्यायाचे प्रतीकचिन्ह तर डोळय़ावरील पट्टी निष्पक्षता आणि निर्भयतेला प्रतिबिंबित करते.
हेही वाचा >>>भीक मागायला चल म्हणत आईवडिलांनी बेदम बदडले; तरीही ‘ चंद्रमुखी, मुस्कान ‘ चमकल्याच…
या न्यायदेवतेचा चेहरा सिंहासारखा दाखवला आहे. त्याच्या एका हातात ध्वजासह दंड तर दुसऱ्या हातात धागा आहे. न्याय करणारा सिंहासारखा निर्भय असावा तसेच सूत्र (धागा) म्हणजे कायद्याच्या मार्गावर चालणारा असावा, अशी यामागची संकल्पना आहे. देशातील न्यायालयांमध्ये याच न्यायदेवतेचे चित्र ठेवण्यासाठी सरन्यायाधीश, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती तसेच न्यायक्षेत्रातील वरिष्ठांकडे मागणी करण्यात आली आहे.रोमन देवीऐवजी भारतीय संकल्पनेवर आधारित न्यायदेवतेच्या प्रतिमेसाठी प्रयत्न होत आहेत. धार्मिक ग्रंथामधून या चित्राची प्रेरणा घेतल्याचे सांगितले जात आहे.
न्यायालयात दिसणाऱ्या न्यायदेवीची संकल्पना भारतीय नाही. ब्रिटिशांनी ती भारतीय न्यायालयांमध्ये आणली. त्याऐवजी धार्मिक न्यायसंहितेवर आधारित न्यायदेवतेची संकल्पना मांडण्यात आली आहे. न्यायदेवीची मूर्ती हटवून न्यायदेवतेची ठेवा, अशी आमची मागणी नाही. आम्ही केवळ आमचे विचार मांडत आहोत. न्यायक्षेत्रातील दिग्गजांपर्यंत आम्ही आमचे विचार पोहोचवले आहेत. भविष्यात ही मोहीम कोणत्या दिशेने जाईल, याबाबत आता भाष्य करता येणार नाही. – अॅड. परिजात पांडे, माजी अध्यक्ष, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा.