अकोला : पारंपरिक प्रचार यंत्रणा आता कालबाह्य झाली असून लोकसभा निवडणुकीत उमेदवारांनी आता प्रचाराचे नवे तंत्र अवगत केले. मुद्दे मात्र जुनेच आहेत. अकोला मतदारसंघातील प्रचाराने जोर पकडला. प्रचारात मतदारसंघातील प्रश्न, समस्या व रखडलेली कामे केंद्रस्थानी असून उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अकोला लोकसभा मतदारसंघात २६ एप्रिलला दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे. मतदारसंघात परंपरेनुसार पुन्हा एकदा तिरंगी लढत आहे. भाजपचे अनुप धोत्रे, काँग्रेसचे डॉ. अभय पाटील व वंचितचे ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्यात अटीतटीचा सामना असल्याचे दिसून येते. सध्या तिन्ही प्रमुख उमेदवारांकडून मतदारांच्या भेटीगाठी, मेळावे, कॉर्नर सभा, बैठकांसह जेवणावळीवर भर दिला जात आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात मतदान होणाऱ्या मतदारसंघांकडे राष्ट्रीय व राज्य स्तरावरील वरिष्ठ नेत्यांनी लक्ष घातले.

हेही वाचा – चंद्रपूर : राजकीय आखाड्यात, चौका-चौकात, कट्ट्यावर रंगू लागल्या ‘ताई’ आणि ‘भाऊ’च्या चर्चा; सट्टाबाजारात…

कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मतदारांना मतपत्रिका पोहोचविणे, घरोघरी पत्रक वाटप आदी कार्याला आता ‘हायटेक’ स्वरूप प्राप्त झाले. ऑनलाइन ॲप, संदेशच्या माध्यमातून ते केले जाते. उद्योग, व्यवसाय, वयोमान, वर्गवारीनुसार प्रचारात ‘सामाजिक अभियांत्रिकी’चे प्रयोग सुरू झाले आहेत. एकाच वेळी लाखोंच्या सभा घेण्यापेक्षा त्या-त्या वर्गातील नेतृत्व व समुहाच्या भेटीगाठींतून व्यूहरचना आखणी केली जाते. प्रचारासाठी समाजमाध्यमांचा सर्वाधिक वापर सुरू आहे. समाज माध्यमातूनच प्रचार करण्याकडे उमेदवारांचा अधिक कल आहे. काही क्षणात लाखो मतदारांपर्यंत पोहोचण्यात समाज माध्यमे उमेदवारांसाठी उपयुक्त ठरत आहेत.

प्रचाराला स्वरूप नवे आल्यानंतरही मुद्दे मात्र जुनेच आहेत. अकोल्यातून गेल्या दोन दशकांपासून भाजपचे संजय धोत्रे खासदार आहेत. आता त्यांचे पूत्र भाजप उमेदवार अनुप धोत्रे यांनी आपल्या प्रचारात मतदारसंघात करण्यात आलेली रस्ते, राष्ट्रीय महामार्ग, उड्डाणपूल, रेल्वेस्थानकाचा विकास, अकोला-अकोट रेल्वेमार्गाचे ब्रॉडगेज, इतर विकास कामे, केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा प्रभावी लाभ आदी मुद्द्यावर जोर दिला. काँग्रेस व वंचित आघाडीकडून मतदारसंघातील विविध प्रश्न व समस्यांवरून भाजपला घेरले. काँग्रेस उमेदवार डॉ. अभय पाटील यांनी बेरोजगारी, उद्योग-व्यवसायांचा अभाव, अपूर्ण विकास कामे आदींवरून भाजपवर निशाणा साधला. ॲड. आंबेडकर यांनी शिवणी विमानतळ, कृषी प्रक्रिया उद्योग, पाणीपुरवठा, खारपाणपट्ट्यातील समस्या या प्रमुख प्रश्नांवरून भाजपला लक्ष्य केले. समाजमाध्यमांतून देखील तिन्ही उमेदवारांच्या समर्थकांकडून एकमेकांच्या उमेदवारांवर टीका-टिप्पणी केली जात आहे. मतदारसंघातील प्रचारात नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जुनेच मुद्दे चर्चेत आहेत.

हेही वाचा – ‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…

आधुनिकतेची जोड

गतिमान युगात सर्वच क्षेत्रात आमूलाग्र बदल होत आहेत. त्याच पद्धतीने निवडणूक यंत्रणेतही बदल घडून आला. निवडणुकीतील प्रचाराची वर्षानुवर्षे चालत आलेली पारंपरिक पद्धत आता काळानुरूप बदलली. निवडणुकीत गल्लोगल्ली भोंगे लावून फिरणारे ऑटो, नेत्यांच्या लाखो मतदारांच्या उपस्थितीतील सभा हे सर्व कायम असले तरी त्याला आधुनिकतेची जोड मिळाली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Campaigning techniques are new but the issues are old campaigning in akola constituency is speeding up ppd 88 ssb