नागपूर : भारतीय व्यवस्थापन संस्था नागपूरने (आयआयएम)आपला वार्षिक प्लेसमेंट अहवाल प्रसिद्ध केला. त्यानुसार संस्थेच्या एका विद्यार्थ्याला सर्वाधिक ६४ लाख रुपयांचे ‘पॅकेज’ मिळाले आहे. यावर्षी ‘कॅम्पस प्लेसमेंट’साठी १०० हून अधिक कंपन्या आल्या. ज्यामध्ये मायक्रोसॉफ्ट, अदानी, आयसीआयसीआय बँक, बँक ऑफ अमेरिका, बीएनवाय मेलॉन आणि इंडस व्हॅली पार्टनर्स यासारख्या नामांकित कंपन्यांचा समावेश होता.
यावर्षीच्या ‘कॅम्पस प्लेसमेंट पॅकेज’मध्ये सरासरी १०.५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. संपूर्ण तुकडीची सरासरी वार्षिक सुमारे १६.७४ लाख रुपये आहे. आयटी, आयटीईएस आणि बीएफएसआय क्षेत्रांनी यावर्षी विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक रस दाखवला आहे. त्यांना मिळणाऱ्या नोकऱ्यांमध्ये धोरण सल्ला आणि विश्लेषण, विक्री आणि विपणन, वित्त, उत्पादन व्यवस्थापन आणि सामान्य व्यवस्थापन यासारख्या जबाबदाऱ्यांचा समावेश होतो.
हेही वाचा: नागपूर: डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, तुम्ही आता मारामारी करणार का?
यावर संस्थेचे संचालक डॉ. भीमराय मैत्री म्हणाले, यंदाच्या ‘प्लेसमेंट’ अहवालातून विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता आणि संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्तेची उत्कृष्टता दिसून येते. प्रत्यक्ष प्लेसमेंटला विद्यार्थ्यांसह कंपन्यांचाही चांगला प्रतिसाद मिळाला. आम्हाला आशा आहे की नवीन संकरित व्यवस्थेमुळे विद्यार्थी आणि रोजगारदाता यांच्यातील परस्परसंवादाची गुणवत्ता वाढेल आणि जास्तीतजास्त विद्यार्थ्यांना नोकरी मिळेल असा विश्वास व्यक्त केला.