लोकसत्ता टीम
अमरावती : लोकसभेत संसद सदस्य म्हणून शपथ घेतल्यानंतर ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) पक्षाचे प्रमुख नेते खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी ‘जय पॅलेस्टाईन’ अशी घोषणा देऊन भारतीय संविधानातील तरतुदींचे उल्लंघन केले असल्याने त्यांचे संसद सदस्यत्व रद्द करावे, अशी मागणी भाजपच्या नेत्या माजी खासदार नवनीत राणा यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्राद्वारे केली आहे.
असदुद्दीन ओवेसी यांनी शपथ घेतल्यानंतर “जय भीम, जय मीम, जय तेलंगणा, जय फिलिस्तीन” अशी घोषणा दिली. त्यांनी घेतलेली अशी शपथ वादात सापडली आहे. भाजपच्या नेत्यांनी असदुद्दीन ओवैसी यांचे सदस्यत्व रद्दबातल ठरवण्याची मागणी केली आहे.
आणखी वाचा-वंचितचा विधानसभेसाठी नव्याने डाव…महाविकास आघाडीसोबत आता चर्चेची दारे…
माजी खासदार नवनीत राणा यांनी राष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्रात ओवेसी यांचे संसद सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली आहे. पॅलेस्टाईन या परराष्ट्राचा भारतीय संविधानाशी कुठलाही संबंध नाही. भारतीय संविधानाच्या १०२ कलमानुसार कोणताही संसद सदस्य दुसऱ्या कुठल्याही राष्ट्रावषयी निष्ठा प्रदर्शित करीत असेल, तर त्याचे सदस्यत्व रद्द केले जाऊ शकते. ओवेसी यांनी शपथ घेतल्यानंतर पॅलेस्टाईन या देशाविषयी आपली निष्ठा आणि आपुलकी प्रदर्शित केली आहे, हे संविधानातील तरतुदीचे उल्लंघन आहे. हे एक गंभीर प्रकरण आहे. ही बाब देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी घातक ठरू शकते. देशाची एकता, अखंडता अबाधित राखणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. खासदार असूनही ओवेसी यांनी आपले कर्तव्य पार पाडण्यात कुचराई केली आहे, हा एक राष्ट्रद्रोह असल्याचे नवनीत राणा यांनी पत्रात म्हटले आहे.
असदुद्दीन ओवेसी यांनी लोकसभेत केलेले वक्तव्य राष्ट्रविरोधी कृत्य आहे. देशाच्या एकता आणि अखंडेतेच्या दृष्टीने ते धोकादायक ठरू शकते, त्यामुळे भारतीय निवडणूक आयोगाकडे राज्यघटनेच्या कलम १०२ मधील तरतुदींविषयी सल्ला मागवून ओवेसी यांचे संसद सदस्यत्व रद्द करावे, अशी मागणी नवनीत राणा यांनी आपल्या पत्रातून राष्ट्रपतींकडे केली आहे. असदुद्दीन ओवेसींनी इतर देशाबाबत म्हणजेच पॅलेस्टाईनबाबत निष्ठा व्यक्त केल्यामुळे त्यांचे लोकसभेचे सदस्यत्व रद्द केले जाऊ शकते, असे नवनीत राणा यांचे म्हणणे आहे.
आणखी वाचा-चंद्रपूर : धारदार शस्त्राने महिलेचा खून, बाबा आमटेंच्या आनंदवनात पहिल्यांदाच…
नवनीत राणा आणि असदुद्दीन ओवेसी यांच्यात लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान वाद निर्माण झाला होता. नवनीत राणा यांनी हैदराबादमध्ये ओवेसी यांच्याविरोधात लोकसभा निवडणूक लढणाऱ्या भाजपा उमेदवार माधवी लता यांच्या प्रचारासाठी हैदराबादमध्ये आयोजित प्रचारसभेला संबोधित केले होते. यावेळी त्यांनी ओवेसी बंधूंवर टीका केली होती.
माधवी लता यांच्या प्रचारसभेत नवनीत राणा ओवेसी बंधूंचे नाव न घेता म्हणाल्या होत्या, “छोट्या भावाने १५ मिनिटांसाठी पोलीस बाजूला करण्यास सांगितले होते. मी आज त्यांना सांगू इच्छिते, छोट्या तुला १५ मिनिटे लागत होती. पण आम्हाला फक्त १५ सेकंद लागतील. १५ सेकंदांसाठी पोलिसांना बाजूला केले, तर छोट्या भावाला समजणारही नाही, कोण कुठून आले आणि कुठे गेले.”