नागपूर: कर्करोगग्रस्त चिमुकल्यांना असह्य वेदनांना सामोरे जावे लागते. या मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलावे म्हणून मेडिकलच्या कर्करोग विभागाने शनिवारी रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेतला. त्यात चिमुकल्यांनी स्वत: राख्या तयार करून त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर- परिचारिकांना त्या बांधल्या. याप्रसंगी मनसोक्त खेळण्यासह खाऊ मिळाल्यामुळे दु:खाचा विसर पडत त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुले ही देवाघरची फुले आहेत, असे म्हटले जाते. परंतु बालपणीच मुलांना कर्करोग झाल्यास त्यांना सतत प्रचंड वेदनांना सामोरे जावे लागते. औषधोपचारासह उपचाराच्या विविध प्रक्रियेदरम्यान त्यांना असह्य वेदना सोसाव्या लागतात. आजाराचे पहिल्या टप्प्यातच निदान होवून योग्य उपचार झाल्यास ही मुले बरी होऊ शकतात. परंतु, तिसऱ्या व चौथ्या टप्प्यात आजाराचे निदान झाल्यास या मुलांना वाचविणे कठीण होऊन बसते. मेडिकलमध्ये उपचाराला येणारे बहुतांश रुग्ण ही दुसऱ्या टप्प्यानंतरच येत असतात. त्यामुळे या मुलांच्या दु:खाच्या काळात चार क्षण तरी त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी मेडिकलच्या कर्करोग विभागात विविध कार्यक्रम घेण्यात येतात.

हेही वाचा – अकोल्यातील सांस्कृतिक भवन लोकार्पणापूर्वीच अडगळीत; अपूर्ण कामामुळे इमारत पडून

हेही वाचा – खबरदार, रामजन्मभूमीबाबत वादग्रस्त बोलाल तर…! विहिंपचा उद्धव ठाकरे गटाला थेट इशारा…..

बुधवारी (३० ऑगस्ट) येथे रक्षाबंधनाचा कार्यक्रम झाला. त्यात कॅनकिड संस्थेच्या वैशाली गोमासे आणि इतर चमूने प्रथम मुलांना राखी बनवण्याचे प्रशिक्षण दिले. त्यांच्याकडून नवीन राख्या तयार करून घेतल्या. याच राख्या मुलांनी नंतर त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर- परिचारिकांना बांधल्या. त्यावेळी अनेकांच्या डोळ्यांच्या कडा अलगद पाणावल्या. शेवटी रुग्णांनी एकमेकांनाही राखी बांधून येथे विविध प्रकारच्या खेळांचा आनंद घेतला. याप्रसंगी चिमुकल्यांना गोड खाद्यपदार्थांसह चॉकलेट देण्यात आले. समर्पण संस्थेने दिलेल्या खेळण्यांसह इतरही साहित्य मुलांना दिले गेले. मुले खेळात रमल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते. कार्यक्रमाला रुग्णांच्या पालकांसह कर्करोग विभागाचे प्रमुख डॉ. अशोक दिवाण, डॉ. विजय मोहबिया, डॉ. पनम काळे यांच्यासह विभागातील सर्व निवासी डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी उपस्थित होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cancer child patients tie rakhi a unique rakshabandhan in a medical hospital in nagpur mnb 82 ssb
Show comments