लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अकोला : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने अकोट मतदारसंघातून विद्यमान आमदार प्रकाश भारसाकळे, तर अकोला पश्चिममधून विजय अग्रवाल यांना उमेदवारी जाहीर केली. दोन्ही मतदारसंघात उमेदवारीसाठी तीव्र स्पर्धा असतांना पक्ष नेतृत्वाने जुन्यांनाच संधी दिली आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची दुसरी यादी शनिवारी दुपारी जाहीर केली. यामध्ये अकोटमधून प्रकाश भारसाकळे, तर अकोला पश्चिम मतदारसंघातून विजय अग्रवाल यांना निवडणूक रिंगणात उतरवले आहे. भाजपने उमेदवारांच्या पहिल्या यादीत अकोटचे विद्यमान व ज्येष्ठ आमदार प्रकाश भारसाकळे यांचे तिकीट जाहीर केले नव्हते. अकोट मतदारसंघातून लढण्यासाठी अनेक जण इच्छूक होते. तिकीटासाठी भारसाकळे यांना पक्षांतर्गतच तीव्र स्पर्धा होती.

आणखी वाचा-गडचिरोलीत भाजपकडून विद्यमान आमदार होळींना डच्चू, डॉ. मिलिंद नरोटे यांना उमेदवारी; ‘लोकसत्ता’चे भाकीत खरे ठरले

महायुतीतील घटक पक्ष शिवसेना शिंदे व राष्ट्रवादी अजित पवार गटाने देखील अकोट मतदारसंघावर दावा केला होता. मात्र, भाजपने अकोट हा मतदारसंघ स्वत:कडे कायम ठेवला. पक्षाने दुसऱ्या यादीत प्रकाश भारसाकळे यांना उमेदवारी जाहीर केली. २०१४ व २०१९ मध्ये सलग दोनदा भाजपच्या तिकीटावर प्रकाश भारसाकळे अकोट मतदारसंघातून निवडून आले आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत सात हजार २६० मतांनी त्यांनी वंचितच्या उमेदवाराचा पराभव केला होता. आता पुन्हा एकदा त्यांच्यापुढे वंचित व काँग्रेसचे आव्हान राहील.

भाजपचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातून भाजपने माजी महापौर विजय अग्रवाल यांना संधी दिली आहे. मतदारसंघात तब्बल २९ वर्षे भाजपचा झेंडा फडकावणारे भाजपचे ज्येष्ठ नेते तथा आमदार गोवर्धन शर्मा यांचे ३ नोव्हेंबर २०२३ रोजी निधन झाल्यामुळे ही जागा वर्षभरापासून रिक्त आहे. भाजप नेतृत्व शर्मा कुटूंबात उमेदवारी देणार की इतरांना संधी देणार, हा कळीचा मुद्दा होता.

आणखी वाचा-प्रहारचे प्रदेशाध्यक्षच भाजपात… ऐन रणधुमाळीत बच्चू कडूंचे शिलेदार…

अकोला पश्चिममधून भाजपकडून लढण्यासाठी २२ जण इच्छूक होते. अखेर पक्ष नेतृत्वाने विजय अग्रवाल यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना उमेदवारी जाहीर केली आहे. या मतदारसंघात २०१९ मध्ये काँग्रेसने भाजपला कडवी झुंज दिली होती. शेवटच्या काही फेऱ्यांमध्ये आघाडी घेत गोवर्धन शर्मा यांचा दोन हजार ३६९ मतांनी निसटता विजय झाला होता. त्यानंतर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा भाजपची पीछेहाट झाल्याचे चित्र आहे. आता विधानसभा निवडणुकीत पक्षाचा बालेकिल्ला कायम राखण्याचे आव्हान नेत्यांपुढे राहणार आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Candidacy to prakash bharsakale in akot and vijay aggarwal in akola west ppd 88 mrj