नागपूर : राज्यभरात पोलीस भरती सुरु असून सध्या लेखी परीक्षा घेण्यात येत आहे. पोलीस भरतीत अनुचित प्रकार घडू नये म्हणून वरिष्ठ पोलीस अधिकारी डोळ्यात तेल घालून काम करीत आहेत. परीक्षेत कुणीही कॉपी करु नये म्हणून दक्षता घेण्यात येत आहे. मात्र, पोलीस भरतीसाठी मैदानी चाचणीत पात्र ठरल्यानंतर केवळ परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी राज्यभरातील परीक्षा केंद्रावर काही ‘मुन्नाभाई’ सक्रिय झाले आहेत. ‘स्पाय माईक’च्या मदतीने कॉपी करुन पेपर सोडवत असल्याची कुणकुण पोलीस अधिकाऱ्यांना होती. असाच एक प्रकार नागपुरात उघडकीस आला असून परीक्षेत ‘हायटेक कॉपी’ करणाऱ्या उमेदवाराला पोलिसांनी अटक केली. परीक्षा केंद्राबाहेरुन प्रश्नांची अचूक उत्तरे सांगणारा त्याचा साथीदार मात्र पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. किसन सीताराम जोनवाल (२७) असे आरोपी उमेदवाराचे नाव आहे तर जीवन काकरवाल (२९ , दोघे रा. तरट्याची वाडी पो. बाभुळगाव ता. वैजापूर जि. छत्रपती संभाजीनगर) असे त्याच्या आरोपी साथीदाराचे नाव आहे.

मानकापूर येथील क्रीडा संकुलात कारागृह शिपाई पद भरती २०२२-२३ साठी लेखी चाचणी परीक्षा घेतली जात आहे. २९ सप्टेंंबरला दुपारी चाचणी परीक्षा घेण्यात आली. परीक्षेत दुपारी ३.२० वाजताच्या सुमारास ‘चेस्ट’ क्रमांक २५०३७ असलेला आरोपी उमेदवार किसन जोनवाल याने परीक्षा उतीर्ण होण्याकरिता बाहेरील त्याचा साथीदार आरोपी जीवन काकरवाल याच्यासोबत कट रचला. ते परीक्षेतील प्रश्न ‘माईक स्पाय’ अशा ईलेक्ट्रानिक डिव्हाईसच्या वापराने सोडवत असल्याचे दिसून आले. या प्रकरणी पोलीस हवालदार प्रकाश काटकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून मानकापूर ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक जावेद तडवी यांनी आरोपींविरूद्ध कलम ३१८ (२), (४), ६१(२), (ए), २२३ सहकलम ६६ (ड) आयटी अ‍ॅक्ट अन्वये गुन्हा दाखल केला आहे. यातील आरोपी किसन जोनवाल याला अटक केली आहे. तर त्याचा साथीदार जीवन काकरवाल याचा पोलीस शोध घेत आहे.

हेही वाचा >>>नागपूर:‘लोकसभा’ जिंकण्यासाठी गडकरींनी केला होता ‘हा’ नवस…

पोलिसांचा हलगर्जीपणा भोवला

पोलीस भरतीच्या मैदानी परीक्षेतही आरोपी उमेदवार किसन जोनवाल याने अशाच प्रकारे पात्रता मिळवल्याची दाट शक्यता आहे. तसेच लेखी परीक्षा देताना परीक्षा केंद्रावर तैनात असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी किसनची अंगझडती घेताना योग्य ती काळजी घेतली नाही. तसेच किसन हा ‘स्पाय माईक’वर बोलत होता आणि बाहेर बसलेल्या साथीदाराकडून प्रश्नाची उत्तरे लिहत होता. या सर्व प्रकार सुरु असताना एकाही पोलीस अधिकाऱ्यांना जीवनवर संशय आला नाही, ही आश्चर्याची बाब आहे. त्यामुळे असाच प्रकार राज्यभरातील लेखी परीक्षेत झाल्याची दाट शक्यता आहे. जीवन कॉपी करताना पकडल्या गेल्यामुळे गुन्हा दाखल झाला. परंतु, राज्यभरातील कित्येक परीक्षा केंद्रावर असाच प्रकार घडल्याची शक्यता आहे.