लोकसत्‍ता टीम

अमरावती : येथील एसआरपीएफच्या भरतीकरिता आलेला एक उमेदवार मैदानी चाचणी दरम्यान जखमी झाला. त्याला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना शुक्रवारी २१ जून रोजी घडली.

ऋषिकेश भाऊराव डहाके (२४) रा. कोठारी, वाशीम असे जखमी उमेदवाराचे नाव आहे. जिल्ह्यात ग्रामीण, शहर पोलीस दल व एसआरपीएफमध्ये भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. सध्या स्थितीत मैदानी चाचणी सुरू असून अमरावतीसह विविध जिल्ह्यांतील उमेदवार त्यासाठी शहरात दाखल झाले आहे. पोलीस मुख्यालय मैदान, जोग स्टेडियम तसेच एसआरपीएफच्या प्रांगणावर मैदानी चाचणी होत आहे. शुक्रवारी एसआरपीएफ कॅम्प येथील प्रांगणावर उमेदवारांची मैदानी चाचणी सुरू होती. या दरम्यान दुपारी दीड वाजता ऋषिकेश डहाके व इतर उमेदवार धावत होते. त्याचवेळी ऋषिकेशचा पाय घसरला. त्यामुळे तो खाली पडला. पायाला इजा झाल्याने उपस्थित एसआरपीएफ कर्मचाऱ्यांनी त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. त्याच्या पायाच्या हाडाला मार बसला असून तो फ्रॅक्चर झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

आणखी वाचा-गडचिरोली : नक्षलवाद्यांच्या कुटुंबीयांची व्यथा! एकीकडे शिक्षणासाठी खंडणी तर दुसरीकडे

दरम्यान, पोलीस भरती रद्द नव्हेतर पुढे ढकलली आहे. ग्रामीण पोलीस दलामध्ये बुधवार, १९ जूनपासून पोलीस भरती प्रक्रियेस सुरुवात झाली. त्या मालिकेत शुक्रवार, २१ जून रोजी सकाळी मैदानी चाचणीकरिता १२०० उमेदवारांना बोलाविण्यात आले होते. परंतु, गुरुवारी रात्री झालेल्या पावसामुळे मैदान पूर्णत: ओले झाले. परिणामी, या उमेदवारांची मैदानी चाचणी घेता आली नाही. त्या उमेवारांची चाचणी आता १६ जुलै रोजी होणार आहे. पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी ही माहिती दिली. पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकामुळे भरती रद्द झाल्याच्या अफवांना पूर्णविराम मिळाला.

ग्रामीण पोलिसांच्या आस्थापनेवरील भरती प्रक्रिया २२ जून व त्यापुढे दररोज नियमितपणेपणे सुरू राहणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी २२ जून व त्यानंतर मैदानी चाचणी असेपर्यंत दररोज त्यांना नेमून दिलेल्या दिनांकास पहाटे ४.३० वाजता जोग स्टेडीयम येथे हजर राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. पावसामुळे मैदान ओले झाल्याने केवळ शुक्रवारची भरती प्रक्रिया रद्द झाली आहे. संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द झालेली नाही. त्यामुळे उमेदवारांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये, असेही ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले आहे.

आणखी वाचा-तुका म्हणे सोपी केली पायवाट! विठूनामात तल्लीन मुक्ताईंची पालखी पोहोचली घाटावर…

अमरावती ग्रामीण पोलीस भरतीकरिता २० जून रोजी रोजी एक हजार उमेदवारांना मैदानी चाचणीकरिता बोलाविण्यात आले होते. त्यापैकी ७१७ उमेदवार हजर झाले. त्यापैकी ६३३ उमेदवारांची शारीरिक चाचणी घेण्यात आली. उर्वरित ८४ उमेदवार उंची, छाती व कागदपत्र तपासणीत अपात्र ठरले. तर भरती प्रक्रियेच्या पहिल्या दिवशी १९ जून रोजी ८०० उमेदवार बोलविण्यात आले होते. त्यापैकी ५७६ उमेदवार हजर झाले. त्यापैकी ४९९ उमेदवारांची शारीरिक चाचणी घेण्यात आली. उर्वरित ७७ उमेदवार अपात्र ठरले होते.

Story img Loader