नागपूर : नागपूर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत उतरलेले शिक्षक भारतीचे उमेदवार राजेंद्र झाडे हे कोट्यधीश तर भाजप समर्थित शिक्षक परिषदेचे उमेदवार नागोराव गाणार हे लक्षाधीश आहेत.
उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या संपत्तीच्या विवरणानुसार झाडे यांच्याकडे एक कोटी ८९ लाख २० हजार १७२ रुपयांची चल, अचल संपत्ती आहे. झाडे यांच्याकडे स्वत:च्या चल संपत्तीचे बाजारमूल्य ७७ लाख २३ हजार ३५७ तर पत्नीकडे असलेल्या चल संपत्तीचे मूल्य २४ लाख २० हजार १७२ रुपये आहे. झाडे यांची स्वत:ची अचल संपत्ती २३ लाखांची आहे आणि पत्नीकडे ६५ लाख रुपयांची अचल संपत्ती आहे. त्यांच्याकडे एक चारचारकी वाहन (१० लाख)आहे. यांच्यावर कुठल्याही गुन्हयाची नोंद नाही.
हेही वाचा >>> नागपूर: फडणवीस यांच्या डीपीसीच्या झटपट बैठकीत काय ठरले?
विद्यमान आमदार नागोराव गाणार यांच्याकडे चल आणि अचल मिळून ५६ लाखांची मालमत्ता आहे. गाणार निवृत्ती वेतनधारक असून त्यांचे २०१८-१९ मध्ये वार्षिक उत्पन्न २१ लाख ७५ हजार ५८९ रुपये होते तर २०२२-२३ ला त्यात वाढ होऊन ३५ लाख ७० हजार १७० रुपयांपर्यंत गेले. त्यांच्या पत्नीकडे ६० ग्रॅम सोने (बाजारमूल्य तीन लाख ३६ हजार) आहे. गाणार यांच्याकडे १४०० चौरस फूट बांधकाम असलेले घर आहे. त्यांच्यावर कुठल्याही प्रकारच्या गुन्ह्यांची नोंद नाही.