देवेश गोंडाणे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर : तलाठी भरतीची गुणवत्ता यादी जाहीर होताच रोज नवीन गोंधळ समोर येत आहे. गुणवत्ता यादीमध्ये जळगाव जिल्ह्यातील दोघा सख्ख्या भावांना जवळपास सारखे गुण असल्याचे उघड झाले आहे. तसेच अहमदनगर येथील एका कुटुंबातील तिघा भावांनाही सारखे गुण आहेत. राज्य सरकार जाणीवपूर्वक याचा तपास न करता उलट आमच्याकडेच पुरावे मागत असल्याचा आरोप उमेदवारांनी केला आहे.

राज्यातून आठ लाख उमेदवारांनी ही परीक्षा दिली. गुण ठरवण्यासाठी सामान्यीकरणाचे (नॉर्मलायझेशन) सूत्र वापरल्याने अधिकचे गुण दिसत असल्याचे स्पष्टीकरण महसूल विभागाकडून देण्यात आले. गुणवत्ता यादीमध्ये जळगाव जिल्ह्यातील दोन सख्ख्या भावांना जवळपास सारखे गुण आहेत. एकाला २०२.४५ तर दुसऱ्याला १९४.०६९ गुण आहेत. तसेच अहमदनगर येथील एका कुटुंबातील तिघा भावांनाही सारखे गुण आहेत. यात क्रमश: २०१.३३, १९९.८९ व १९५.२७ गुण आहेत. असाच प्रकार २०१९च्या तलाठी भरतीमध्येही घडला होता. तेव्हा ‘लोकसत्ता’ने हा घोटाळा उघडकीस आणला होता.

हेही वाचा >>>झाडावर तीस फूट उंचीवर आढळला मृत बिबट्या, हृदय घाताने मृत्यू झाल्याची शक्यता

‘सरकारने तपासात पुढाकार घ्यावा’

तलाठी भरती प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याचे पुरावे सादर करावेत. पुरावे योग्य असल्यास चौकशी करून परीक्षा रद्द करू, अशी भूमिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी घेतली. मात्र, आरोप होत असताना शासन स्वत: दखल घेऊन या प्रकरणाची चौकशी का करीत नाही, परीक्षा देणारा विद्यार्थी पुरावे कुठून देणार, असा प्रश्न स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचे राहुल कवठेकर यांनी केला आहे. तसेच परीक्षा घेणाऱ्या कंपनीकडे सर्व केंद्रांचे चित्रीकरण आहे. त्यातून तपास करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे

सखोल चौकशी करा सुप्रिया सुळे

नुकत्याच झालेल्या तलाठी भरती परीक्षेत गैरप्रकार झाल्याचे दिसून येत आहे. या परीक्षांसाठी खूपच परीक्षा शुल्क आकारले जाते. या प्रकरणाची चौकशी करून दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई करा, अशी मागणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Candidates allege that the government is not investigating the talathi recruitment case nagpur amy