देवेश गोंडाणे, लोकसत्ता
नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) मार्फत घेण्यात आलेली स्थापत्य अभियांत्रिकी परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतरही मुलाखत न झाल्यामुळे स्वप्निल लोणकर या उमेदवाराने आत्महत्या केली होती. या घटनेमुळे राज्यभरात खळबळ उडाल्यानंतर राज्य सरकारने विद्यार्थीप्रेमी असल्याचा पुळका आणत एमपीएससीला बळकट करून भरती प्रक्रियेला गती देण्याचे आश्वासन दिले. यानंतर स्थापत्य अभियांत्रिकी पदाच्या मुलाखती झाल्या. मात्र, स्वप्निलच्या आत्महत्येला वर्ष लोटल्यानंतरही राज्यभरातील ३ हजार ६६१ विद्यार्थी अद्यापही अंतिम निकालाच्या प्रतीक्षेतच आहेत.
एमपीएससीने स्थापत्य अभियांत्रिकीची पदे भरण्याकरिता ३ एप्रिल २०१९ रोजी जाहिरात प्रकाशित केली होती. त्यात आर्थिक दुर्बल घटक आणि सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गासाठी जागा आरक्षित ठेवण्यात आल्या होत्या. त्यानंतर २८ जुलै २०२० रोजी मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर झाला व आर्थिक दुर्बल घटकातील १२६ व त्यावर गुण मिळवलेल्या उमेदवारांना पुढील फेरीसाठी पात्र ठरवण्यात आले. मात्र, ५ मे २०२१ ला सर्वोच्च न्यायालयाने सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गाचे आरक्षण अवैध ठरवल्यामुळे भरती प्रक्रिया रखडली. यानंतर राज्य सरकारने ९ सप्टेंबर २०२० पूर्वी अंतिम निकाल जाहीर झालेल्या, पण नियुक्ती प्रक्रिया प्रलंबित असलेल्या भरतींबाबत सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गातील उमेदवारांना आर्थिक दुर्बल घटकात सामावून घेण्याचा निर्णय घेतला. ३१ मे २०२१ रोजी यासंदर्भातील शासन निर्णय जाहीर झाला. या निर्णयानुसार एमपीएससीने २३ जुलै २०२१ रोजी स्थापत्य अभियांत्रिकीच्या मुख्य परीक्षेचा सुधारित निकाल जाहीर केला. यामध्ये पात्र ठरलेल्या ३६६१ उमेदवारांच्या ऑक्टोबर २०२१ ते फेब्रुवारी २०२२ पर्यंत मुलाखती घेण्यात आल्या.
मुलाखती आटोपल्यानंतर आयोगाकडून लगेच निकाल जाहीर केला जातो. मात्र, स्थापत्य अभियांत्रिकीच्या ११४५ जागांचा अंतिम निकाल अद्यापही रोखून ठेवण्यात आला आहे. इतक्या मोठय़ा संख्येने उमेदवारांनी मुलाखती दिल्या असतानाही निकाल जाहीर होत नसल्याने उमेदवारांकडून आता आयोगाच्या भूमिकेवर शंका उपस्थित केली जात आहे. यासंदर्भात विचारणा करण्यासाठी आयोगाचे अध्यक्ष आणि सचिवांशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
‘ऑप्टिंग आऊट’मुळे संभ्रम
स्थापत्य अभियांत्रिकीच्या मुलाखतीनंतर १२ फेब्रुवारी २०२२ ला साधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली होती. गुणवत्ता यादीनंतर उमेदवारांना भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा पर्याय (ऑप्टिंग आऊट) आणि पदाचा पसंतीक्रम नोंदवण्यासाठी १२ ते २० फेब्रुवारीची मुदत देण्यात आली होती. मात्र, एमपीएससीने पुन्हा १६ मार्चला ‘ऑिप्टग आऊट’ची लिंक सुविधा सुरू केल्यामुळे उमेदवारांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे.