नागपूर : ‘एसटी’च्या चालक-वाहकांच्या अंतिम पात्रता परीक्षेत उमेदवारांना पात्र ठरवण्यासाठी पैशांची देवाणघेवाण झाल्याचा ‘व्हिडीओ’ पुढे आल्यावर महामंडळाने तीन अधिकाऱ्यांना निलंबित केले.दरम्यान, येथे पात्र ठरवलेल्या अनेक उमेदवारांना बस योग्यरित्या चालवताही येत नसल्याने काही अधिकाऱ्यांनी पैसे घेऊन येथे चुकीच्या हातात एसटीचे ‘स्टेअरिंग’ही दिल्याचे पुढे येत आहे.
एसटी महामंडळाची सरळ सेवा भरती प्रक्रिया २०१९ मध्ये पार पडली होती. पण, करोनाची साथ आल्याने प्रक्रिया रखडली होती. शासनाने अंतिम पात्रता परीक्षा घेऊन भरती करण्याचे आदेश दिले होते. यासाठी १७ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान चालक आणि वाहकांची अंतिम पात्रता परीक्षा घेण्यात आली. नागपूर जिल्ह्यातील धापेवाडालाही पात्रता परीक्षा झाली. परंतु, येथे उमेदवारांना वाहन योग्यरित्या चालवता येत नसतांनाही अनेकांना पैसे घेऊन पात्र केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला.
हेही वाचा: एसटी’तील पात्रता परीक्षेत पैशांची देवाणघेवाण, तीन अधिकारी निलंबित; महामंडळाची कारवाई
याविषयीचा ‘व्हिडीओ व्हायरल’ झाल्यावर विविध यंत्रणेकडून प्राथमिक स्वरूपात हा प्रकार पुढे आल्याने एसटीच्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. हा प्रकार बघता पैसे घेऊन चुकीच्या हातात एसटीचे ‘स्टेअरिंग’ दिल्यावर राज्यात या चालकांकडून अपघात वाढल्यास जबाबदार कोण? हा गंभीर प्रश्न आता उपस्थित झाला आहे. दरम्यान, या प्रकरणाच्या चौकशीनंतर एसटीच्या व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांच्या सूचनेवरून तडकाफडकी तीन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. मात्र, वाहन योग्यरित्या चालवता येत नसलेल्यांचीही नियुक्ती झाली असल्यास महामंडळ या उमेदवारांवर काय कारवाई करणार, याकडेही आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
प्रक्रिया कशी असते?
एसटीच्या चालक-वाहक पदाच्या पात्रता परीक्षेत चालकाला वाहन चालवताना परिवहन खात्याच्या नियमाप्रमाणेच एसटी महामंडळाने नियम घालून दिले आहेत. त्यानुसार उमेदवार हा वाहन चालवण्यात कुशल असायलाच पाहिजे. त्यानुसारच उमेदवाराची महामंडळाकडून पात्रता परीक्षा आयोजित केली जाते. या परीक्षेत उमेदवाराच्या वाहन चालवण्यात काही दोष दिसल्यास त्याला पुन्हा प्रशिक्षणासाठी पाठवले जाते.
एसटी महामंडळातील वरिष्ठांच्या सूचनेवरून दक्षता व सुरक्षा पथकाकडून या प्रकरणाची चौकशी केली. हा अहवाल स्वीकारत व्यवस्थापकीय संचालकांनी तीन अधिकाऱ्यांना निलंबित केले. या प्रकरणातील पात्र उमेदवारांना वाहन योग्यरित्या चालवता येते की नाही याबाबत मला माहीत नाही. परंतु, पैसे देणाऱ्यांत काही दोष असल्याचीही शक्यता नाकारता येत नाही. ते याबाबतच्या चौकशीतूनच स्पष्ट होऊ शकेल. – धम्मरत्न डोंगरे, वरिष्ठ सुरक्षा व दक्षता अधिकारी, एसटी महामंडळ, नागपूर विभाग.