नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) तीन महिन्यांपूर्वी राज्यसेवा २०२३ परीक्षेचा निकाल जाहीर केला. त्यानंतर वैद्याकीय तपासणीही झाली. परंतु आयोगाच्या ढिसाळ कारभारामुळे तीन महिन्यांनंतरची संपूर्ण प्रक्रिया रखडली आहे. उत्तीर्ण उमेदवारांना पसंतीक्रम देणे, त्यानंतर पुन्हा तात्पुरती यादी जाहीर करणे, भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा (ऑप्टिंग आऊट) पर्याय देणे आणि त्यापुढच्या सर्वच प्रक्रिया थांबल्या आहेत. त्यामुळे राज्यसेवेसारखी महत्त्वाची परीक्षा उत्तीर्ण होऊनही परीक्षार्थ्यांच्या पदरी निराशा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘एपीएससी’कडून जून २०२३ मध्ये राज्यसेवा गट-अ आणि गट-ब दर्जाच्या ३०३ पदांसाठी परीक्षा घेण्यात आली. त्यानंतर जानेवारी २०२४ मध्ये मुख्य परीक्षा व ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात मुलाखती घेण्यात आल्या. त्यानंतर उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली. महेश अरविंद घाटुळे प्रथम तर प्रीतम मधुकर सानप याने दुसरा क्रमांक पटकावला आहे. नागपूरच्या वैष्णवी हरिभाऊ बावस्कर हिने मुलींमध्ये पहिला क्रमांक पटकावला. निकाल जाहीर करताना उमेदवारांना लवकरच पदांचे पसंतीक्रम ऑनलाइन सादर करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात येईल, असे आयोगाने स्पष्ट केले होते. परंतु सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर होऊन तीन महिन्यांचा कालावधी उलटला तरी परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. दोन वर्षांपासून उमेदवार या परीक्षेची तयारी करीत होते. निकालही जाहीर झाला. परंतु पुढची संपूर्ण प्रक्रिया थांबली आहे. विशेष म्हणजे, मागील काही वर्षांत आयोगाकडून प्रत्येक परीक्षा आणि निकालाच्या प्रक्रियेला विलंब होत आहे. त्यामुळे उमेदवारांना प्रचंड मनस्ताप होत आहे. एकाच परीक्षेसाठी अनेक वर्षे वाट बघत राहावे लागल्याने उमेदवारांची चिंता वाढली आहे.

पुन्हा वैद्याकीय तपासणीचा धोका!

●शासन निर्णय जून २०२३ नुसार, वैद्याकीय तपासणीनंतर एका वर्षात नियुक्ती न झाल्यास उमेदवारांना पुन्हा वैद्याकीय तपासणी करावी लागते.

●त्यामुळे उमेदवारांच्या हातात आता फक्त पाच महिने शिल्लक आहेत.

●जर ही संपूर्ण प्रक्रिया १ ऑगस्ट २०२५ पूर्वी पूर्ण झाली नाही, तर पुन्हा वैद्याकीय तपासणीस सामोरे जावे लागेल.

‘एमपीएससी’च्या अशा ढिसाळ कारभाराचा विद्यार्थ्यांना प्रचंड फटका बसतो आहे. एका परीक्षेचा निकाल आणि नियुक्ती मिळण्यास दोन ते तीन वर्षे लागत असतील तर हे चूक आहे. परीक्षा आणि नियुक्तीचा कालबद्ध कार्यक्रम असणे आवश्यक आहे. राज्यसेवा २०२३ च्या विद्यार्थ्यांची पुढील प्रक्रिया आयोगाने तात्काळ पूर्ण करावी.- उमेश कोर्राम, स्टुडंट राईट्स ऑफ इंडिया.

आयोगाकडून संपूर्ण प्रक्रिया सुरू आहे. उमेदवारांनी चिंता करू नये. लवकरच पुढील प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.- डॉ. सुवर्णा खरात, सचिव, एमपीएससी.