नागपूर : महायुतीमध्ये उमेदवारांचा निर्णय जातीच्या आधारावर होणार नाही. तर गुणवत्ता आणि कार्यक्षमतेच्या आधारावर उमेदवारांचा विचार केला जाणार असल्याचे मत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.

चंद्रशेखर बावनकुळे नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत होते. भारतीय जनता पक्षाने कधीही जात, धर्माचे राजकारण केले नाही आणि करणार नाही. आमची हिंदुत्वाची भूमिका प्रखर आहे आणि महत्त्वाची आहे. कोणत्याही परिस्थितीत हिंदुत्वाशी तडजोड करणार नाही. या देशात राहून बांगलादेश व पाकिस्तानचे समर्थन करणाऱ्यांशी आम्ही कधीही जुळवून घेणार नाही. या देशाच्या प्रत्येक हिंदू बांधवाशी आमची बांधिलकी असल्याचे बावनकुळे म्हणाले.

हेही वाचा – विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी न्यायालयाने नियमांपलिकडे…

मध्यप्रदेशात लाडकी बहीण योजना बंद झाल्याचे संजय राऊत म्हणाले. पण, ते खोटे बोलत आहेत. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी एक कोटी तीस लाख महिलांना योजना सुरळीत सुरू असल्याची माहिती दिली. महाराष्ट्रात महायुतीचे सरकार असून आमच्या काळात योजना सुरू झाली. पुढे सुरूच राहणार आहे. मात्र जिथे जिथे काँग्रेसचे सरकार आले महिलांच्या योजनांसह अनेक योजना योजना बंद केल्या आहेत. राऊत यांनी काँग्रेस शासित राज्य कर्नाटक, हिमाचल, तेलंगणा बद्दल बोलले पाहिजे. त्यांच्या विरोधात मध्य प्रदेशमध्ये गुन्हा दाखल झाला असल्याचे बावनकुळे म्हणाले. महाविकास आघाडीचा खोटारडेपणा हा महिलांना उदध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही, असेही बावनकुळे म्हणाले. राहुल गांधी खटाखट निधी घ्या असे म्हणाले होते. ते आता खोटे निघाले. आरक्षण बद्दलही राहुल गांधी खोटे बोलले होते. त्यामुळे नाना पटोले यांनी वास्तविकतेचे भान ठेवावे. त्यांना मुंगेरीलाल के हसीन स्वप्न पडत आहे अशी टीका त्यांनी केली.

हेही वाचा – “रवी राणांचा पाना सर्व नटांना कसणार”, नवनीत राणा यांचा विरोधकांना टोला

उद्धव ठाकरे यांना भाजपसोबत असताना मानसन्मान होता मात्र आता आघाडीमध्ये त्यांचे काय हाल होत आहेत, हे जनता पहात आहे. शरद पवारांनी त्यांची काय परिस्थिती केली आहे. आम्ही मान सन्मान दिला मात्र आघाडीसोबत जाऊन त्यांनी पक्षाची माती केली आहे. त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी त्यांना आघाडीमध्ये मुख्यमंत्री करणार नाही. २०१९ मध्ये त्यांना महायुती फोडायची होती म्हणून त्यांनी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री केले. आता त्यांची आघाडीमध्ये उपयोगिता संपली आहे, अशी खोचक टीका बावनकुळे यांनी केली. आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.