लोकसत्ता टीम
वर्धा : वर्धा लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार म्हणून खासदार रामदास तडस यांच्याच नावाची पुन्हा घोषणा झाली. अन् पहिल्याच यादीत नाव आल्याबरोबर पक्षांतर्गत विरोधकांचा पोटशूळ उठल्याचे चित्र पुढे आले.
तडस सोबतच अन्य तीन उमेदवारी मिळावी म्हणून इच्छुक होते. खुद्द प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचेही नाव चर्चेत राहले. तेली समाज मेळाव्यात तडस समर्थकांनी बावनकुळे यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत टीकेची तोफ डागली होती. त्याचे वृत्त लोकसत्तात उमटताच बावनकुळे यांनी तीव्र नाराजी नोंदविल्याची चर्चाही झाली.
मात्र, हा प्रकार तडस यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करणारा ठरल्याचा सूर उमटल्यावर पक्षातीलच तेली समाज नेत्यांनी तडस यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेणे सुरू केले. एक माजी खासदार, मोर्शी येथील माजी भाजप तालुकाध्यक्ष यांनी उघड तर काहींनी कुरबुर करीत नाराजी नोंदविणे सुरू केले. त्याचे पडसाद वरिष्ठ पातळीवर उमटले. त्याचीच दखल घेत चंद्रशेखर बावनकुळे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज सायंकाळी सहा वाजता वर्धा दौऱ्यावर येत आहे.
आणखी वाचा- आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांसाठी अन्नत्याग….
जिल्हाध्यक्ष सुनील गफाट यांनी यांस दुजोरा दिला. समस्या समजून घेण्यासाठी तसेच नाराज मंडळींचे मात विचारात घेण्यासाठी हे नेते येत आहे. नाराजी निश्चित दूर होईल, असा विश्वास गफाट यांनी व्यक्त केला. या सभेत जिल्हाध्यक्ष यांनी निमंत्रित केलेल्या पदाधिकाऱ्यांनाच उपस्थित राहता येणार आहे. अन्यांना प्रवेश वर्ज्य आहे. दीडशे मंडळी निमंत्रित असल्याचे सांगण्यात आले. अधिकृत पक्ष कार्यालयात नव्हे तर दुरवर बायपास वरील इव्हेंट सभागृहात ही बैठक होणार. याच सभेत तडस यांच्या प्रचाराची धुरा सांभाळू शकणाऱ्या सूत्रधारांची निवडणूक होईल. प्रामुख्याने कुणबी नेत्यांवर ही दारोमदार असेल, असे एका वरीष्ठ नेत्याने नमूद केले.
आघाडीच्या उमेदवाराचे नाव अद्याप घोषित होणे बाकी असल्याने ही निवडणूक सोपी जाणार असल्याचा उत्साह काही भाजप नेते दाखवितात. त्याला फडणवीस यांनीच चाप बसवावा, असे सुचविल्या जाणार आहे. ही बैठक काय तोडगा काढणार, याकडे तडस विरोधकांचे लक्ष लागले आहे.