नागपूर : माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस नेते अनिल देशमुख यांचा बालेकिल्ला काटोल मतदारसंघात युवक काँग्रेसचे नेते याज्ञवल्क्य जिचकार यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केल्याने ते सध्या चांगलेच चर्चेत आहे. भारतीय जनता पक्षाने अजूनही या मतदारसंघातून उमेदवार न दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यामुळे आता याज्ञवल्क्य यांच्या उमेदवारीमागे कोण यावर राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहे.
काँग्रेसचे दिवंगत नेते श्रीकांत जिचकार यांचे सुपुत्र याज्ञवल्क्य यांनी कॉंग्रेसकडे काटोल मतदारसंघातून उमेदवारी मागितली होती आणि त्यांनी काम सुरू केले होते. मात्र काटोल-नरखेड विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे असल्याने व तेथून या पक्षाने अनिल देशमुख यांना अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर केले. त्यामुळे याज्ञवल्क्यने अपक्ष म्हणून काटोल मतदारसंघातून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय जनता पक्षाने दुसरी यादी जाहीर केली मात्र या यादीत काटोल मतदारसंघाचा समावेश करण्यात आला नाही. या मतदारसंघातून डॉ. आशिष देशमुख यांच्यासह अविनाश ठाकरे, चरणसिंग ठाकूर यांनी दावा केला आहे. काटोल जिल्ह्यातील मूळ रहिवासी आणि दिवंगत श्रीकांत जिचकार यांचे पुत्र एवढीच सध्या तरी याज्ञवल्क्य याची राजकीय शिदोरी आहे. युवक काँग्रेसचे ते पदाधिकारी आहे. त्या आधारावर त्यांनी आता राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील प्रमुख व्यक्ती अनिल देशमुख यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या काटोल मतदारसंघातून अर्ज दाखल केला आहे. त्यांना अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीत उभे करण्यासाठी कोणाची फूस आहे यावर आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
हेही वाचा – VIDEO : भाजपने तिकीट कापले अन् आमदार रडायला लागले; म्हणाले, “पक्षाने माझ्यावर…”
पक्षाच्या पाठिंब्याची पर्वा न करता ही जागा लढवण्याच्या जिचकार यांच्या निर्णयामुळे महाविकास आघाडीतील संभाव्य फुटीबद्दलच्या अटकळांना उधाण आले आहे. जिचकार यांनी या महत्त्वाच्या मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीत उतरण्याचा आपला इरादा अधिकृतपणे जाहीर केला असून, कोणत्याही परिस्थितीत आपण लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या घोषणेने स्थानिक राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. काटोल मतदारसंघात अलिकडच्या वर्षांत, विशेषतः शिक्षण, आरोग्य सेवा आणि उद्योग यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये स्तब्धता आहे यावर जिचकार यांनी भर दिला. विकासाच्या बाबतीत हा प्रदेश मागे राहिला असल्याचे मत मांडून आवश्यक ते बदल घडवून आणण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे
त्यांच्या उमेदवारीमुळे अनिल देशमुख यांनी प्रदीर्घ काळ जोपासलेल्या बालेकिल्ल्याला धक्का बसण्याची शक्यता आहे.