महामार्गावर गांजाची बेकायदेशीर वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी एका कारमधून २६ लाख रुपये किंमतीचा २६५ किलो गांजा जप्त केला. या प्रकरणी अकोला जिल्ह्यातील कय्युम शहा शहेनशहा, रा. बोरगाव मंजू व शरद बाळू गावंडे, रा. मूर्तिजापूर या दोघास अटक करण्यात आली. कारंजा घाडगेजवळ बोरगाव फाटा येथे ही कारवाई करण्यात आली.
मार्गावर नाकेबंदी करीत स्थानिक गुन्हे शाखेचे महेंद्र इंगळे व चमूने एका वाहनास रोखले. झडती घेल्यावर काहीच आढळून न आल्याने पोलिसांनी सीट फोडली. त्यात छोट्या वेगवेगळ्या डब्ब्यात ओलसर हिरवट पाने, फुले असलेला गांजा आढळला. कॅनाबिस जातीची ही वनस्पती असल्याचे सांगण्यात येते. त्याची किंमत २६ लाख ५३ हजार रुपये आहे. यासह साडेतीन लाख रुपये किमतीची कार, दोन मोबाइल असा एकूण ३० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.