लोकसत्ता टीम
वाशीम: उन्हाळ्याचे दिवस असल्याने तापमानात वाढ होत आहे. आज २२ एप्रिल रोजी शहरातील बांधकाम विभागाजवळ उभ्या असलेल्या चार चाकी गाडीने अचानक पेट घेतला. यामुळे एकच खळबळ उडाली. यामुळे काही वेळ वाहतूकही खोळंबली होती.
वाशीम शहरातील सार्वजनिक बांधकाम कार्यालयासमोर उभ्या असलेल्या स्वीफ्ट डिझायर गाडी क्रमांक एम एच ३७ जी ८१५९ या चार चाकी गाडीने अचानक पेट घेतला. आगीची माहिती मिळताच अग्नीशमन वाहन घटनास्थळी दखल झाले होते. परंतु, सुदैवाने यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नसून चार चाकी वाहन मात्र जळून खाक झाल्याची धक्कादायक घटना घडली. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. या घटनेची चर्चा शहरात चांगलीच होत आहे.