बुलढाणा : मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रणेते मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ जिल्ह्यातही उग्र आंदोलन पेटण्याची चिन्हे आहे. त्या अगोदरच आज जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांच्या कार्यालय परिसरात एक ‘कार’ पेटली! …
हेही वाचा >>> मराठा आरक्षण आंदोलन पेटले असतानाच… परदेशी शिक्षणाची वाट खडतर! सरकारकडून झाली ही चूक
या महागड्या चारचाकी वाहनाने पेट घेण्याचे ‘टायमिंग’ देखील अफलातून होते. सकल मराठा समाजाचे शिष्टमंडळ जिल्हाधिकारी किरण पाटील यांना निवेदन देऊन चर्चा करीत असतांनाच ‘डस्टर मॉडेल’ च्या कार मधून अचानक धूर निघाला! लगेच वाहनाने पेट घेतला. यामुळे जिल्हा कचेरी परिसरात खळबळ उडाली. या कार जवळ उभ्या असलेल्या ‘स्कुटी’ ला काढण्यासाठी गेलेला व्यक्ति यामुळे भयभीत होऊन सुरक्षित अंतरावर गेला. त्याने आरडाओरड केल्यावर पोलीस व कर्मचारी धावले.
…हे होते कारण दरम्यान याची माहिती मिळताच बुलडाणा नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेतली. दलाने आग आटोक्यात आणली. दरम्यान बॅटरीचा स्फोट झाल्याने कार पेटल्याचे स्पष्ट झाले . दुसरीकडे शिष्टमंडळातील कार्यकर्त्यांनी लगेच खुलासा केला. जिल्ह्यात सकल मराठा समाजाचे होणारे आंदोलन शांततेच्या मार्गानेच होईल असे त्यांनी सांगितले.