लोकसत्ता टीम
नागपूर: बुलडाणाजवळी शिंदखेड राजा शहराजवळ अपघातात २५ जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच बुटीबोरीजवळ कारचा मोठा अपघात झाला. चालकाला डुलकी लागल्याने पुलावरून कार थेट रेल्वे रुळावर पडली. या अपघातात ५ जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर बुटीबोरीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात रविवारी सकाळी साडेसात वाजता बुटीबोरीतील बोरखेडीजवळ झाला.
एकाच कुटुंबातील पाच जण कारने हैदराबाद येथून नागपूरच्या दिशेने जात होते. चालकाला डुलकी लागल्याने कार अचानक पुलावरून खाली कोसळली. रविवारी सकाळी साडेसातच्या सुमारास नागपूरच्या बोरखेडी उड्डाणपुलावरून भरधाव वेगात असलेली कार रेल्वे रुळावर पडली. या अपघातात कारमधून प्रवास करणारे ५ जण जखमी झाले आहेत. जखमींना स्थानिक खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती स्थानिक बुटीबोरी पोलिसांनी दिली. कारमधील सर्व प्रवाशांची स्थिती गंभीर असल्याची माहिती आहे.
आणखी वाचा-नागपूर : समृद्धी महामार्गावर सलग दुसऱ्या दिवशी अपघात, दोघे अत्यवस्थ
कारच्या धक्क्याने रेल्वेच्या उच्च दाब वाहिनीचा खांबही कोलमडून रेल्वे रुळावर पडला. त्यामुळे नागपूर ते वर्धाकडे जाणाऱ्या रेल्वे रुळ बंद करण्यात आला. रेल्वे रुळ दुरुस्त करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या प्रकरणी बुटीबोरी पोलिसांनी अपघाताची नोंद केली आहे.