बुलढाणा : आज बुधवार, २३ एप्रिल रोजीची सकाळ समृद्धी महामार्गवरील भीषण अपघाताची बातमी घेऊन आली. या दुर्घटनेत दोन प्रवासी ठार तर तिघे जखमी झाले आहे. या घटनेचा तपशील प्राप्त झाला नाही.

प्राप्त प्राथमिक माहितीनुसार आज बुधवारी, २३ एप्रिल रोजी सकाळी संभाजीनगर कडून नागपूरच्या दिशेला जाणारी भरधाव कार समृद्धी वरील पुलाच्या कठड्याला धडकली. ही धडक इतकी भीषण होती की, कार चा अक्षरशः चुराडा झाला. शिवणी पिसा ते धानोरा या गावांच्या मधोमध समृद्धी महामार्गावर असलेल्या सीता नदीच्या पुलावर अपघात झाला.एका भरधाव गाडीने पुलाला धडक दिली. त्यामध्ये एकूण पाच प्रवासी होते. त्यातील दोन प्रवासी जागीच ठार झाले. तिघाना उपचारासाठी नजीकच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.

दरम्यान डोणगाव पोलिसांनी घटना स्थळी दाखल होत अपघात ग्रस्त वाहन बाजूला सरकावून समृद्धी वरील वाहतूक सुरळीत केली. जखमीची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आल्याचे सांगण्यात आले. केंद्रीय आरोग्य, आयुष, परिवार कल्याण मंत्री प्रतापराव जाधव यांनी शव विच्छेदन लवकर करण्याचे निर्देश आरोग्य यंत्रनांना दिले. शिवसेना (शिंदे गट) मेहकर शहर प्रमुख जयचंद बाठीया यानी ही माहिती दिली. अपघात ग्रस्तना सुमारे पाऊण तास कोणत्याही स्वरूपाची मदत मिळाली नसल्याचा आरोपही त्यांनी बोलून दाखविला.

सलग दुसऱ्या दिवशी अपघात

दरम्यान समृद्धी वर सलग दुसऱ्या दिवशी अपघात झाला आहे. काल मंगळवारी, २२ एप्रिलला मेहकर तालुक्यातील डोणगाव नजीक पेट्रोल पंप जवळ कार अपघातात एक इसम ठार झाला होता. मार्गावर लावलेल्या झाडांना पाणी देणाऱ्या कामगारला भरधाव कारने धडक दिली. यात आशीष (राहणार कुंमरी, जिल्हा आमरोह, मध्यप्रदेश राज्य) हा ठार झाला होता. ज्ञानेश्वर बोरसे नमक कामगार जखमी झाला होता.