लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर : घरासमोर कार पार्कींग करण्याच्या वादातून एका पोलीस कर्मचाऱ्याने एका व्यक्तीला मारहाण केली. या मारहाणीत त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. मुरलीधर रामराम नेवारे (५०, वाठोडा) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तर निखिल गुप्ता (३०) असे आरोपी पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

या प्रकरणात पोलीस कर्मचारी आरोपी असल्यामुळे वाठोडा पोलीस गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करीत होते. शेवटी नातेवाईकांनी वरिष्ठांकडे जाण्याची तयारी केल्यामुळे पोलीस कर्मचारी निखिल विरुद्ध वाठोडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

आणखी वाचा-राज्यात हत्याकांडाच्या घटनांमध्ये वाढ

निखिल गुप्ता हा राज्य राखिव पोलीस दलाचा कर्मचारी असून त्याची पत्नी नागपूर पोलीस विभागात पोलीस कर्मचारी आहे. निखिलच्या बहिणीचे घर वाठोड्यात आहे. गुरुवारी रात्री निखिल गुप्ता हा तेथे कारने आला. त्याने नेवारे यांच्या घरासमोर कार लावली आणि नेवारे यांच्याशी वाद घातला. त्यानंतर निखिलने नेवारे यांना कानाखाली मारली तसेच त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यामुळे नेवारे हे बेशुद्ध पडले. कुटुंबियांना त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांचा उपचारादरम्यान शनिवारी मृत्यू झाला. वाठोडा पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यासाठी टाळाटाळ करीत नेवारे यांच्या नातेवाईकांना ठाण्यातून हाकलून लावल्याची माहिती आहे.

या प्रकरणी ठाणेदार जामदार यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Car parking dispute one person died after being beaten up by policeman adk 83 mrj