वर्धा : प्रयागराज येथील कुंभस्नान आटोपले. पवित्र अंतकरणाने घरी निघाले असतानाच वाटेत घात झाला. कुटुंबातील दोन महिला जागीच ठार झाल्या तर एका चिमुकल्यासह तिघे गंभीर जखमी झालेत. आज सकाळची ही घटना आहे.
वर्धेलगत दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या येळकेळी येथे समृद्धी मार्गावर हा अपघात घडला. कर्नाटकच्या बंगरुळू येथील हा परिवार आहे. गाडीमालक स्वतः गाडी चालवीत होते. दुपारी वाहनातील नावांची खात्री झाली.
प्राप्त माहितीनुसार बंगरूळू येथील परिवार काही दिवसापूर्वी प्रयागराज येथे कुंभस्नान करण्यास गेला होता. स्नान आटोपून परतीच्या प्रवासास निघाले. नागपूर येथे पोहचल्यावर शिर्डीच्या साई दर्शनास जाण्याचे ठरले. म्हणून आज सकाळी हे कुटुंब समृद्धीमार्गे आपल्या विस्ता सीएरा ( के ए ५१ एम एक्स ८७६१ ) या गाडीने निघाले होते.
वाटेत असताना या गाडीसमोर एक ट्रक चालला होता. मात्र, हा ट्रक चुकीच्या लेनवरून म्हणजे अवजड वाहनासाठी नसलेल्या मार्गावरून धावत होता. म्हणून त्यास ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करीत असताना ही कार वेगात उलटली. आणि चेपल्या गेली. त्यात राम्याश्री नरेश नायडू वय ३२ व शकुंतला रामकृष्णय्या वय ४५ या दोन महिला जागीच ठार झाल्या. तर तिघे जखमी झाले.
जखमी झालेल्या नजय्या कोलूर शिवाहृदया वय ३५, पूर्वीक नरेश नायडू वय ६ व अन्य एक अश्या तिघांना सावंगी येथील मेघे विद्यापीठाच्या आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गाडीचा चक्काचूर झाल्याचे दिसून येते. सावंगी पोलीस अधिक तपास करीत आहे. नेमकी बेलगाव शिवारात हा अपघात घडला आहे.
वर्धा जिल्ह्यातील समृद्धी महामार्गचे अंतर मोठ्या लांबीचे आहे. वर्ध्यातून येलाकेळीमार्गे अमरावती व नागपूर अश्या दोन्ही दिशेने जाता येते. त्यामुळे या भागात जलदगतीने धावणाऱ्या वाहनांची एकच गर्दी उसळते. आतापर्यंत विसच्यावर अपघात या भागात झालेले आहे. सुरक्षेचे उपाय व देखरेख या दृष्टीने हा समृद्धी महामार्ग अद्याप ‘अनाथ’ असल्याची टीका होत असते. वेगातील, अवजड, लहान अश्या वाहनांसाठी वेगवेगळ्या मार्गीका म्हणजेच लेन आहेत. पण ते पाळल्या जात नसल्याने आजच्यासारखे अपघात घडतात, असा सूर आहे.