नागपूर: नागपुरातील कोराडी मार्गावरील उड्डाणपुलाखाली झालेल्या एक कार आणि दोन एसटी बस अशा तीन वाहनांतील विचित्र अपघातात नऊहून अधिक प्रवासी जखमी झाले. त्यांना नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) हलवण्यात आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूरहून गोंदिया, रामटेकसह इतरही मार्गावर रोज मोठ्या संख्येने एसटी बसेस धावतात. मंगळवारी सकाळी १०.४५ वाजताच्या दरम्यान गोंदिया आगाराची बस आणि त्यामागे रामटेक आगाराची बस सावनेरहून नागपूरच्या दिशेने येत होती. याचवेळी कोराडीतील उड्डानपुलाखाली एक भरधाव चारचाकी कार जात होती. दुसरीकडे वळणातून एक सिमेंट मिक्सर ट्रक जात होता. दरम्यान अचानक भरधाव कारचा टायर फुटून ती विरुद्ध बाजूच्या एसटी बसच्या पुढे रस्त्यावर घसरत आली. बस चालकाने जोरात ब्रेक दाबला. त्यानंतरहीही बस संबंधित कारवर धडकली. ब्रेकमुळे बसची गती कमी झाल्याने कारचालक थोडक्यात बचावला. दरम्यान धडकलेल्या बसच्या मागे असलेली रामटेक आगाराची दुसरी एसटी बस पुढच्या एसटीवर धडकली. या घटनेत मोठ्या संख्येने प्रवासी जखमी झाले.

अचानक झालेल्या अपघाताने प्रवाशांनी आरडाओरड सुरू केली. अपघाताचे गांभीर्य बघत परिसरातील नागरिकांनी अपघातग्रस्त बस आणि कारकडे धाव घेतली. तातडीने जखमी प्रवाशांना खाली उतरवले. त्यापैकी जास्तच मार लागलेल्या सुमारे ९ जणांना नागपुरातील मेडिकल रुग्णालयात नेले. घटनेची माहिती कळताच स्थानिक पोलिसांसह एसटीच्या अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी धाव घेतली. या अपघातामुळे येथे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. परंतु पोलिसांनी काही तासांत अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. जखमींवर मेडिकलच्या ट्रामा केअर सेंटरमधील तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीत सध्या उपचार सुरू आहे. अपघातातील जखमींमध्ये काहींच्या डोके, नाकाला मार लागला.

कार चालकाकडून चुकीची कबुली

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नागपूर विभागाचे नियंत्रक विनोद चावरे म्हणाले, सदर प्रकरणात तातडीने जखमींना महामंडळाकडून उपचारासाठी मदत केली जात असून दुसरीकडे घटनेच्या कारणांचाही शोध घेतला जात आहे. दरम्यान अपघातग्रस्त कारचालकाने त्याची चूक असल्याचे मान्य केले आहे. ही कार रस्त्यावर उलटून आडवी आल्यावर वेळीच एसटी चालकाने ब्रेक लावल्याने मोठी दुर्घटना टळल्याचेही चावरे यांनी सांगितले.

डिसेंबर २०२४ मध्ये शिवशाहीचा मोठा अपघात

गोंदिया जिल्ह्यात डिसेंबर २०२४ रोजी एसटी महामंडळाच्या शिवशाही बसला झालेल्या अपघातात ११ प्रवासी ठार तर २८ प्रवासी जखमी झाले होते. त्यानंतर नागपूर जिल्ह्यातील हिंगण्याजवळ शालेय विद्यार्थ्यांना सहलीवर घेऊन जाणाऱ्या बसचाही अपघात झाला होता.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Car st buses hit under flyover in nagpur 9 passengers injured mnb 82 ssb