शोभिवंत झाडांनी केवळ हिरवळ वाढली, प्रदूषणाचा स्तर मात्र कायमच
रस्त्याच्या दुतर्फा आणि रस्ता दुभाजकावर लावल्या जाणाऱ्या झाडांमुळे शहराच्या हिरवळीत वाढ होत असली तरीही कार्बन डायऑक्साईड शोषणाऱ्या झाडांचे प्रमाण यात अत्यल्प असल्याचे निदर्शनास आले आहे. विकासाच्या दिशेने होणाऱ्या शहराच्या वाटचालीच्या आधारावर शहरातील पर्यावरणाचे संतुलन राखणे गरजेचे आहे. मात्र, ऑक्सिजन सोडणाऱ्या आणि कार्बन डायऑक्साईड अधिक प्रमाणात शोषून घेणाऱ्या झाडांचे प्रमाण कमी असल्याने पर्यावरणाच्या मोठय़ा समस्येला सामोरे जावे लागू शकते, अशी भीती शहरातील पर्यावरणवाद्यांनी व्यक्त केली आहे.
इस्त्रायल सरकारने त्यांच्या देशात शोभिवंत झाडांऐवजी भरपूर ऑक्सिजन देणाऱ्या आणि पक्ष्यांचे जीवन तोलून धरणाऱ्या वृक्षांची लागवड करून पर्यावरणीयदृष्टय़ा जगात नवा आदर्श निर्माण केला. भारतातील सर्वच शहरांमध्ये याबाबतीत विरोधाभास दिसून येतो. हिरवळीसाठी ओळखल्या जाणाऱ्या नागपूर शहरातही हा विरोधाभास आहे. वृक्षारोपणासाठी सरसावणाऱ्या हातांमध्ये वाढ होत असली तरीही वृक्षलागवडीसाठी कोणत्या झाडांची निवड करावी याचे ज्ञान अनेकांना नाही. कार्बन डायऑक्साईड शोषून ऑक्सिजन देणाऱ्या झाडांच्या लागवडीचे प्रमाण अलीकडच्या काही वर्षांत कमी होत आहे. त्यामुळे शोभिवंत झाडांच्या लागवडीवरच अधिक भर दिला जातो. शहरातील पूर्व आणि उत्तर नागपूरमध्ये हिरवळीचे प्रमाण अतिशय कमी आहे. त्यातच आता विकासाच्या दिशेने झेपावणाऱ्या शहरात दुचाकीच नव्हे तर चारचाकी वाहनांची संख्याही भरमसाठ वाढली आहे. त्यामुळे प्रदूषणाची पातळी उंचावत आहे. नुसते हिरवे शहर म्हणून शहराची ओळख कायम ठेवण्यासाठी प्रशासनाने रस्त्याच्या दुतर्फा, रस्ता द्विभाजकावर वृक्षलागवड केली. मात्र, यात शोभिवंत झाडांचे प्रमाण अधिक असल्यामुळे शहरातील प्रदूषणाचा स्तर कमी झालेला नाही. प्रदूषण रोखण्याच्या उद्देशाने शोभिवंत झाडांऐवजी कार्बन डायऑक्साईड शोषणारी आणि ऑक्सिजन देणारी झाडे लावली असती तर पर्यावरणीयदृष्टय़ा ते अधिक उपयोगाचे ठरले असते. पश्चिम नागपूर, विमानतळ मार्गावर मोठय़ा प्रमाणात वृक्षलागवड करण्यात आली, पण मनीषनगर, मानेवाडा, हुडकेश्वर परिसर वृक्षाविना ओसाड आहे आणि हा विरोधाभास आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पर्यावरण वाचवायचे असेल तर..
सामाजिक वनिकरणात गेल्या काही वर्षांत सुबाभूळ,
गुलमोहोर, निलगिरी अशी विदेशी झाडे लावण्यावर अधिक भर दिला, पण या झाडांचा पक्षी, कीटक, बुरशी, जमिनीतील जीवाणू यांना उपयोग नाही. उलट ही झाडे जमिनीतील पाणी शोषून घेतात आणि या पानांचे जमिनीत विघटनही होत नाही. पर्यायाने झाडाखालची जमीन नापिक होते. याउलट वड, पिंपळासारखे देशी वृक्ष इथल्या जैवविविधतेला सहकार्य करतात. पक्षी, प्राणी, कीटके, बुरशी आणि सगळे जीवजंतू यांच्यावर जगतात. पिंपळ १०० टक्के, वड ८० टक्के तर कडूलिंब ७५ टक्के कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात. गेल्या ६८ वषार्ंत भारतात सरकारतर्फे वड, पिंपळ, कडूलिंब ही झाडे लावणे पूर्णपणे बंद झाले आहे. मात्र, पर्यावरण वाचवायचे असेल तर सर्वाधिक कार्बन डायऑक्साईड शोषून घेणारी झाडे लावली जावीत.
-गणेश हजारे, पर्यावरणप्रेमी

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Carbon dioxide absorbing tree plantation closed
Show comments