लोकसत्ता टीम

नागपूर : हृदयविकाराच्या सरासरी वयात घट होत असल्याचे निरीक्षण हृदयरोग तज्ज्ञांनी नोंदवले आहे. हृदयरोग तज्ज्ञांच्या निरीक्षणानुसार, मधूमेह विकाराचे अर्ध्या आणि रक्तदाबाच्या ३० टक्के रुग्णांना त्यांच्या आजाराबाबत माहितीच नसते. हे विकार दीर्घकाळ अनियंत्रित राहिल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो. आधी हृदयविकाराचे सरासरी वय हे ५८-६२ असे होते. आता मात्र, ५०-५३ मध्येच हृदयरोग होत आहे. त्यातही तरुणांची संख्या लक्षणीय आहे.

बदलती जीवनशैली, असंतुलित आहार व व्यायामाचा अभावामुळे तरुणांमध्येही हृदयरोग बळावत आहे. भारतात दर ३३ सेकंदाला एक व्यक्ती हृदयविकाराच्या झटक्याने दगावते. जगभरातील सर्वाधिक हृदयविकाराचे रुग्ण भारतात आहेत. शिवाय भारतीयांना नैसर्गिकरीत्याच हृदयविकाराची जोखिम आहे; कारण आपल्या रक्तवाहिन्यांचा आकार पाश्चिमात्यांच्या तुलनेत छोटा आहे. शिवाय हृदयाच्या एकाहून अधिक रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज निर्माण होण्याचे प्रमाणही अधिक आहे. दुसरं म्हणजे वाढती लोकसंख्या व त्यामुळे निर्माण झालेली स्पर्धा, ताणतणाव, बदलती जीवनशैली आणि प्रदुषण देखील हृदयविकाराला पुरक ठरत आहेत. योग्य दिनचर्या व आहाराने हृदयविकाराच्या जोखिमा निश्चितच टाळता येतात.

आणखी वाचा-उपमुख्यमंत्री फडणवीसांनी बैठक घेताच ओबीसी समाजातील ७५ विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्ती मंजूर

भारतीयांना अधिक जोखिम असल्याने त्यांनी वेळेतच संतुलित आहार व दिनचर्येचा अवलंब करून हृदयरोगांचा धोका टाळण्यास प्रयत्न केला पाहिजे. आहारात डबाबंद पदार्थ व अतिसारखेचे सेवन टाळणे आवश्यक आहे. बसून राहणे, हे नव्या पिढीचे स्मोकिंग झाले आहे. अधिक बसून राहिल्यास हृदयरोग होण्याचा धोका धुम्रपान करणार्‍या व्यक्तीएवढा होत असतो.

भारतीयांना धोका अधिक- डॉ. बीडकर

भारतीयांच्या रक्तवाहिन्यांचा आकार पाश्चिमात्यांच्या तुलनेत छोटा आहे. शिवाय हृदयाच्या एकाहून अधिक रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज निर्माण होण्याचे प्रमाणही अधिक आहे. त्यामुळे भारतीयांना नैसर्गिकरित्याच हृदयविकाराचा धोका जास्त आहे, अशी माहिती हृदयरोग तज्ज्ञ अमेय बीडकर यांनी दिली.

आणखी वाचा-उपमुख्यमंत्री फडणवीसांनी बैठक घेताच ओबीसी समाजातील ७५ विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्ती मंजूर

गर्भाशय काढलेल्या महिलांना धोका- डॉ. शेंबेकर

वयाच्या पन्नासीनंतर महिलांमध्ये हार्मोनल बदल होतात. त्यामुळे जास्त वयाच्या पुरुषांप्रमाणेच हृदयविकाराचा धोका वाढतो. गर्भाशय व अंडाशय काढलेल्या महिलांनाही हृदयविकाराची शक्यता असते. त्यामुळे महिलांनी योग्य आहार घ्यावा व वेळोवेळी आरोग्य तपासणी करावी, असा सल्ला स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. चैतन्य शेंबेकर यांनी दिला.

पुरुषांनी वयाची तीस वर्षे ओलांडल्यानंतर तर महिलांनी वयाच्या पस्तीशी नंतर नियमित आरोग्य तपासणी करावी. आजाराचे आधीच निदान झाल्यास पुढे मोठे धोके टाळणे शक्य आहे, अशी माहिती हृदयरोग तज्ज्ञ डॉ. संतणू सेनगुप्ता यांनी दिली.

जोखीम वाढतेय…

  • अनियंत्रित मधूमेह
  • अनियंत्रित रक्तदाब
  • बैठी जीवनशैली
  • व्यायामाचा अभाव
  • लठ्ठपणा
  • कोलेस्ट्रॉलचे प्रमाण
  • धुम्रपान