नागपूर : वाढत्या बालगुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्यात ‘केअर’ नावाने पहिला हा उपक्रम नागपुरात राबविण्यात आला होता. आता ‘केअर’च्या धर्तीवर राज्यभरात ‘हेल्पडेस्क’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. गृहमंत्रायलयाने सकारात्मकता दाखविल्यामुळे या उपक्रमासाठी राज्यातील पाच शहरांची निवड करण्यात आली आहे. 

बाल गुन्हेगारांना मुख्य प्रवाहात आणण्यासह त्यांचे समुपदेशन करण्यासाठी राज्यातील पहिला उपक्रम नागपूर पोलिसांनी राबविला होता. तत्कालिन पोलीस आयुक्त डॉ़. भूषणकुमार उपाध्याय यांनी ‘एन-कॉप्स एक्झलेन्स’ या इमारतीत ‘केअर’ (कॉऊंसिलींग अँड रिफॉर्मेटिव्ह एज्युकेशन सेंटर) या उपक्रमाची सुरुवात केली होती. विधीसंघर्षग्रस्त बालकांना गुन्हेगारी सोडून मुख्य प्रवाहात आणण्यासाठी येणाऱ्या अडचणींची सोडवणूक व्हावी, यासाठी प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये बाल कल्याण पोलीस अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली होती. विधिसंघर्षग्रस्त बालकांनी शिक्षण घेणे आवश्यक आहे.

घडलेला गुन्हा पुन्हा घडू नये,अशी स्थिती निर्माण करीत परिवर्तनाच्या नव्या मार्गावर आणावे, पोलिसांनीही बाल गुन्हेगारांच्या नजरेने न बघता सामान्य मुलांप्रमाणे बघावे, हा उद्देश केअर उपक्रमात राबविण्यात आला होता. त्याच धर्तीवर आता राज्यात हेल्पडेस्क नावाने उपक्रम सुरु करण्यात आला आहे. मुलांचे हक्क व किशोरवयीन गुन्हेगारांचे पुनर्वसन करण्यासाठी, कायदेशीर, सामाजिक, समुपदेशन सेवा पुरविण्यासाठी राज्यातील निरीक्षणगृहांमध्ये ‘हेल्पडेस्क’ स्थापन करण्यात आला आहे.

‘हेल्पडेस्क’ उपक्रम सामाजिक संस्थांमार्फत चालविण्यात येणार आहेत. न्याय प्रविष्ट प्रकरण असलेल्या मुलांच्या पुनर्वसनासाठी किशोर न्याय संसाधन कक्ष, टाटा सामाजिक विज्ञान संस्था आणि महिला व बाल विकास विभागाकडून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. गृहमंत्रालयाने या उपक्रमासाठी सकारात्मकता दाखविल्यामुळे आता हा उपक्रम संपूर्ण राज्यभरातही राबविण्यात येणार आहे.

पुणे-ठाण्यासह पाच शहरांत उपक्रम

विधीसंघर्षग्रस्त बालक किंवा न्याय प्रविष्ट प्रकरण असलेल्या मुलांच्या पुनर्वसनासाठी ‘हेल्पडेस्क’ काम करणार आहे. सध्या पुणे, ठाणे, लातूर, नागपूर, यवतमाळ या पाच शहरांचा या उपक्रमात समावेश करण्यात आला आहे. यानंतर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

हेल्पडेस्क उपक्रमाचा उद्देश

गुन्हेगारीत अडकलेली अनेक मुले गरीब, दुर्बल घटकांतील असून त्यांना कायदेविषयक माहितीचा अभाव असतो. अनेकदा वकिलांकडून दिशाभूल, समाजातील कलंक व भावनिक आघात यामुळे न्याय प्रक्रियेत अडथळे येतात. पालकही अनेकदा कायदेशीर प्रक्रियेबाबत अनभिज्ञ असतात, तसेच मुलांनी अमली पदार्थापासून दूर राहण्यासाठी त्यांचे समुपदेशन व मार्गदर्शन करण्यासाठी या हेल्पडेस्कची मदत होणार आहे.

“नागपूर पोलिसांनी २०१८ मध्येच विधीसंघर्षग्रस्त बालकांना मदत व्हावी तसेच बालगुन्हेगारीवर नियंत्रण मिळावे, या उद्देशाने केअर उपक्रम सुरु केला होता. यामध्ये उपायुक्त गजानन राजमाने यांची महत्वाची भूमिका होती. या उपक्रमामुळे जवळपास ५० टक्के बालगुन्हेगारी कमी झाली. ” – डॉ. भूषणकुमार उपाध्याय माजी पोलीस महासंचालक