लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बुलढाणा : भरधाव मालवाहू वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत तरुणी ठार, तर तिची आई गंभीर जखमी झाली. बुलढाणा-चिखली राज्य मार्गावरील भरवाहतुकीच्या त्रीशरण चौकात आज सोमवारी, १० फेब्रुवारीला संध्याकाळी ही दुर्देवी घटना घडली. यामुळे चांडक ले आऊट परिसर व अपघातग्रस्तांचे मूळ गाव साखळीमध्ये (ता. बुलढाणा) हळहळ व्यक्त होत आहे.

छाया संदीप चौधरी (५५) आणि स्नेहल संदीप चौधरी (२४) या मायलेकी स्कुटीने चिखली मार्गांवरून डाक विभाग कार्यालयाकडे जात होत्या. दरम्यान, मागेहून भरधाव वेगात आलेल्या मालवाहू वाहनाने (महिंद्रा पीक अप) त्यांच्या स्कुटीला जोरात धडक दिली. यात स्नेहलच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, तर आई गंभीर जखमी झाल्या.

अपघाताची माहिती कळताच बुलढाणा शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी मायलेकींना स्थानिक जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान स्नेहलची प्राणज्योत मालविली. तिच्या आईची प्रकृती गंभीर असल्याचे रुग्णालय सूत्रांनी सांगितले.

मूळचे साखळी येथील रहिवासी असलेल्या चौधरी कुटुंबाचे सध्या बुलढाणा शहरातील चांडक ले आऊट परिसरात वास्तव्य आहे. स्नेहलचे वडील संदीप चौधरी जिल्हा परिषदेत कनिष्ठ लेखाधिकारी पदावर कार्यरत आहेत. बुलढाणा शहर पोलिसांनी मालवाहू वाहन चालक आरोपी संतोष भास्कर बाहेकर (२७, रा. किन्होळा, ता. चिखली, जि. बुलढाणा) याला ताब्यात घेतले.