नागपूर : स्वयंघोषित समाज माध्यम विश्लेषक अजित पारसेचा आणखी एक प्रताप उघडकीस आला असून त्याने सीबीआयच्या नावाचा गैरवापर करून कोतवालीतील एका संस्थेच्या संस्थाचालकांना ५० लाखांची खंडणी मागितली होती. घाबरलेल्या संस्थाचालकांनी पैशाची जुळवाजुळवही केली होती, परंतु, पारसेचा वेळेवर बुरखा फाटल्यामुळे संस्थाचालक थोडक्यात वाचले, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोतवाली परिसरात एक सामाजिक संस्था आहे. पाच ते सहा संचालक सामाजिक कार्य करीत समाजात जनजागृती करण्याचे काम करतात. त्या संस्थेतून प्रयोग, शिक्षण आणि प्रशिक्षणाचे कामही केल्या जाते. त्या संचालकांशी घनिष्ठ संबंध असणाऱ्या जांभ्या नावाच्या कार्यकर्त्याने पारसेला त्यांच्या कार्यालयात नेले होते. त्या सर्व संचालकांची ओळख करून दिली होती. पारसेने त्या संस्थेच्या संबंधातील सर्व माहिती हेमूला काढण्यास सांगितली होती. विश्वासातील असलेल्या जांभ्याने संचालकांचा विश्वासघात करीत संस्थेतील काही माहिती पारसेला दिली होती. काही दिवसानंतर अजितने सीबीआयचे बनावट चौकशी पत्र तयार केले. त्या पत्रावर बनावट शिक्के मारले. ते पत्र त्या संस्थाचालकांना पाठविण्यात आले.
हेही वाचा : नागपूर: अजित पारसेला अटक करण्यास पोलिसांची टाळाटाळ, वारंवार आत्महत्या करण्याचे नाटक
जांभ्याने नेहमीप्रमाणे त्या संस्थाचालकांची भेट घेतली. त्यांना पारसेची दिल्लीतील पंतप्रधान कार्यालयात ओळख असल्याचे सांगितले. त्याला विनंती करून सीबीआयची चौकशी थांबविण्याचे प्रयत्न करण्याचा सल्ला दिला. त्याप्रमाणे संचालकांनी कारवाईच्या भीतीपोटी पारसेची भेट घेतली. त्याने सीबीआयचे पत्र बघून कारवाई थांबविण्यासाठी ५० लाख रुपये सीबीआयच्या अधिकाऱ्यांना द्यावे लागतील, अशी बतावणी केली. संचालक घाबरलेल्या अवस्थेत असल्याचा जांभ्या आणि पारसेने गैरफायदा घेतला. संचालकांनी पैशाची जुळवाजुळ सुरू केली. मात्र, यादरम्यान पारसेने डॉ. राजेश मुरकुटे यांना साडेचार कोटींना फसविल्याचे समोर आले. तसेच डॉ. मुरकुटेंना सीबीआयच्या कारवाईची भीतीही दाखविण्यात आली होती, अशी माहिती समोर आली. त्यामुळे पारसे आणि जांभ्याचा डाव उलटला. दोघांनी संस्था चालकांकडून ५० लाखांची खंडणी उकळली असती, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
अजित पारसे सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे. त्यामुळे तुर्तास त्याची अटक टळली आहे. मात्र, पोलीस डॉक्टरांच्या संपर्कात आहेत. पोलिसांनी डॉक्टरांना पत्र लिहून पारसेचा वैद्यकीय अहवाल मागितला होता. पारसेवर उपचार सुरु असल्यामुळे त्याची दिवाळी रुग्णालयातच जाणार आहे. परंतु, त्याला लवकरच अटक करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.