अमरावती : आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यातील वाद आता चिघळला असून बच्चू कडू यांनी रवी राणांना प्रत्युत्तर देताना त्यांच्यावर खालच्या भाषेत टीका केली होती. याप्रकरणी बच्चू कडू यांच्यावर राजापेठ पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधानातील कलम ५०१ अंतर्गत बच्चू कडू यांच्यावर अब्रूनुकसानीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वी आमदार रवी राणा यांच्या विरोधात वक्तव्य करताना बच्चू कडू यांनी रवी राणा यांच्या पत्नी आणि आईचा अपमान केला असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करीत महिला मुक्ती आघाडीच्या वतीने बच्चू कडू यांच्या विरोधात तक्रार देण्यात आली. या तक्रारीच्या आकारावर पोलिसांनी आमदार बच्चू कडू यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.बच्चू कडू हे संविधानाचा भान न ठेवता बेजबाबदारपणे वागत आहेत. शासकीय कार्यालयात जाऊन अनेक कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करणे त्यांच्यावर हात उगारणे हा त्यांचा नेहमीचाच उद्योग झाला आहे. आमदार हा कर्मचाऱ्यांवर हात उभारत असेल तर तो अकार्यक्षम आहे हे स्पष्ट होते असे देखील तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
हेही वाचा : बच्चू कडू, रवी राणांमध्ये संघर्षाची ठिणगी नेमकी केव्हा पडली ?
तृतीयपंथीयांचा देखील बच्चू कडू यांनी अपमान केला असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. बच्चू कडू यांच्या विरोधात महाराष्ट्रातील सर्वच पोलीस ठाण्यात तक्रारी देऊ असा इशारा महिला मुक्ती संघटनेचे अध्यक्ष अशोक खरात ,गीता वाघ, किशोर गोरडे, पुरुषोत्तम कडू,बाळू इंगळे, वैशाली पिऊ लकर आदींनी दिला आहे.
गेल्या काही दिवसांपासून रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध सुरू आहे. रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर, शिंदे गटासोबत जाण्यासाठी गुवाहाटीत पैसे घेतल्याचा आरोप केला होता. त्यानंतर संतापलेल्या बच्चू कडू यांनी पत्रकार परिषद घेत ‘एका बापाची अवलाद असेल तर रवी राणा यांनी माझ्यावर केलेल्या आरोपाचे पुरावे द्यावेत’, असे आव्हान दिले होते. यामधील ‘एका बापाची औलाद’ हा शब्दप्रयोग बच्चू कडू यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : खोक्यांचा वाद पेटला! बच्चू कडू रवी राणांवर ठोकणार ५० कोटींचा दावा
रवी राणा यांनी गुरुवारी एक ट्विट करुन बच्चू कडू यांना पुन्हा अप्रत्यक्षपणे डिवचले होते. दिवा जेव्हा विझतो तेव्हा तो फडफड करतो, त्यातला ‘हा’ एक दिवा आहे, दिवाळीत खूप फटाके फुटले त्यातला ‘हा’ फुसका फटाका आहे, असे रवी राणा यांनी ट्विटमध्ये म्हटले होते. या टीकेला बच्चू कडू यांनीही प्रत्युत्तर दिले आहे. माझा इशारा हा फुसका बार आहे की बॅाम्ब आहे, हे १ तारखेला दाखवू. हा बॉम्ब कसा कुणाच्या खाली लावायचा हे बच्चू कडूला चांगले माहीत आहे. बॉम्ब कसा आहे हे १ तारखेला कळेल, असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.