येथील खंडेलवाल नगर परिसरात राहणाऱ्या एका तेरा वर्षीय शाळकरी मुलाच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी शनिवारी तखतमल इंग्लिश हायस्कूलच्या मुख्याध्यापिकेविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला.चैतन्य दिवाकर सिसोदे (१३) या इयत्ता आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने गेल्या ८ सप्टेंबरला आपल्या खंडेलवाल नगर परिसरातील घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्याने आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्याआधारे बडनेरा पोलिसांनी तखतमल इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका वैशाली चिखलकर-रौंदळकर यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला आहे.या प्रकरणी मृत चैतन्यची आई अंजली यांच्या तक्रारीच्या आधारे बडनेरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारीनुसार त्या ८ सप्टेंबरला सायंकाळी किराणा सामान खरेदी करण्यासाठी बाहेर गेल्या होत्या. परत आल्यानंतर त्यांनी घराचे दार उघडण्यासाठी मुलगा चैतन्य याला आवाज दिला. त्याने प्रतिसाद न दिल्याने त्यांनी त्याच्या मोबाईलवर संपर्क साधला. पण, तोही उचलला गेला नाही. अखेर अंजली यांनी घरात डोकावून पाहिले असता, त्यांना चैतन्य हा पंख्याला गळफास लावलेल्या अवस्थेत दिसला. अंजली यांनी आरडाओरड केली, पण शेजारचे कुणीही मदतीला आले नाही. अंजली यांनी त्यानंतर पुणे येथे अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत असलेल्या त्यांच्या मुलीशी संपर्क साधला. तिच्या सांगण्यावरून अंजली यांनी दोरी कापून चैतन्यला खाली काढले.
नागपूर : अश्लील छायाचित्र प्रसारित करण्याची धमकी देत वकिलाचा महिलेवर बलात्कार
त्याला लगेच एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. पण, त्याला मृत घोषित करण्यात आले.यादरम्यान, चैतन्य ज्या रुबिक क्यूब सोबत खेळत होता, त्या खेळण्याला एक चिठ्ठी चिपकवलेली आढळली. इंग्रजी भाषेतील या चिठ्ठीत मुख्याध्यापिकेने आपल्याला मारहाण करून वर्गाबाहेर काढल्याने आत्महत्या केल्याचे नमूद केले आहे. वर्ग सुरू असताना आपण मित्राला भेटण्यासाठी बाहेर गेलो होतो, या कारणावरून आपल्याला मारहाण करण्यात आली, त्यामुळे इतर विद्यार्थी आपल्यावर हसत होते, असे त्याने लिहून ठेवले आहे. ही चिठ्ठी समोर येताच अंजली या पोलीस ठाण्यात पोहचल्या. त्या आधारे पोलिसांनी मुख्याध्यापिका वैशाली चिखलकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.