अकोला : राज्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असतांना वाशीम जिल्ह्यातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दहावीची परीक्षा देऊन घराकडे निघालेल्या दोन विद्यार्थिनींवर शिक्षकाची वाईट नजर पडली. कारने घरी सोडून देण्याच्या बहाण्याने त्या शिक्षकाने नको तेच कृत्य केले. या प्रकरणी पीडित मुलींसह पालकांनी कारंजा ग्रामीण पोलीस ठाणे गाठून नराधम शिक्षकाविरोधात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी शिक्षकावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. आरोपी शिक्षक फरार झाला आहे. शिक्षकी पेशाला काळिमा फासणाऱ्या या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. राज्यात विविध ठिकाणी महिलांवरील अत्याचाराच्या घटना समोर येत आहे.
वाशीम जिल्ह्यात देखील गेल्या काही दिवसांमध्ये अल्पवयीन मुली व महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून अनेक धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये गुरु-शिष्याचे पवित्र नाते असते. मात्र, याची जाण न ठेवता शिक्षकाने विद्यार्थिनींसोबत गैरकृत्य केले.
वाशीम जिल्ह्याच्या कारंजा तालुक्यातील पिंप्री फॉरेस्ट येथील स्व.बाबासाहेब नाईक विद्यालय येथे दोन विद्यार्थिनी दहावीचा पेपर देण्यासाठी ३ मार्च रोजी गेल्या होत्या. पेपर देऊन त्या शाळेसमोर उभ्या होत्या. बराच वेळ झाल्यावरही त्यांना घेण्यासाठी कोणी आले नाही. त्यामुळे शाळेच्या मुख्याध्यापकांनी त्यांना शिक्षक गजानन बाजारे यांच्या कारमधून जाण्यास सांगितले.
मात्र, कामठवाडा गावापर्यंत गेल्यानंतर या शिक्षकाने त्या दोन मुलींसोबत अश्लील चाळे करून विनयभंग केला. यावेळी याच गाडीमध्ये इतर दोन शिक्षकही होते. त्यांनी गजानन बाजारे याच्या कृतीला विरोध केला. दोन्ही मुलींना गाडीच्या खाली उतरून ऑटो रिक्षाने त्यांच्या घरी सोडले. या घटनेमुळे दोन्ही विद्यार्थ्यांनी घाबरल्या होत्या. त्यांनी घरी गेल्यावर या घटनेची माहिती आपल्या पालकांना दिली.
पालकांनी थेट कारंजा ग्रामीण पोलीस ठाणे गाठून नराधम शिक्षकाविरोधात तक्रार दाखल केली. कारंजा पोलिसांनी शिक्षक गजानन बाजारे (५७, रा. शिक्षक कॉलनी, कारंजा) याच्या विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. घटनेचा पंचनामा करून पोलिसांनी आरोपी शिक्षकाचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केली आहेत. या घटनेमुळे वाशीम जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. जिल्ह्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.