नागपूर : भारतीय जनता पक्षाने त्यांचे नेते, त्यांच्या संस्था आणि समर्थक बांधकाम व्यावसायिकांना महाराष्ट्रातील अनेक शहरातील मोक्याची भूखंड नाममात्र दरात वाटप केले आहे. वित्त व नियोजन खात्याने आक्षेप घेतल्यानंतरही भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नागपूरजवळील कोराडी येथील संस्थेला जमीन दिली आहे. लोकसत्ताने ही बातमी प्रकाशित केल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या ‘महालक्ष्मी जगदंबा संस्थान, कोराडी’ संस्थेला नवीन महाविद्यालय तसेच तंत्रशिक्षण व नर्सिंग महाविद्यालय सुरु करण्यासाठी पाच हेक्टर जागा देण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. वित्त आणि महसूल विभागाचा विरोध डावलून रेडीरेकनर दरासुसार सुमारे पाच कोटींची ही जमीन नाममात्र दरात देण्यात आली आहे. या मुद्यांवरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारला धारेवर धरले आहे. महायुती सरकारची ओळख जमीन लुटारू म्हणून झाली आहे. विविध शहरातील मोक्याचा जागा त्यांच्या संस्थांना, त्यांच्या बांधकाम व्यावसायिकांना रेडिरेकनरपेक्षा २५ टक्के कमी दराने देण्यात आल्या आहे. या सरकारने राज्यातील आजवर सुमारे पाच लाख कोटींच्या जमीन नाममात्र दारात वाटल्या आहेत, असे वडेट्टीवार म्हणाले.

हेही वाचा – राज्यभरातील ‘आरटीओ’चे कामकाज ठप्प, संपकर्ते कर्मचारी म्हणतात…

माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे वरिष्ठ नेते अनिल देशमुख यांनीही भूखंड वाटपावर टीका केली. ते म्हणाले, सरकारच्या दबावाखाली नाममात्र दारात भूखंड वाटण्यात येत आहेत, बावनकुळे यांच्या संस्थेला पाच कोटींची जमीन अतिशय अल्प दरात देण्यात आली. जमीन वाटपास वित्त खात्याने नामंजुरी दिली होती. पण सरकारमध्ये भाजपचे वर्चस्व आहे. त्यांच्या दबावाखाली हा निर्णय घेण्यात आला. पण, आपल्याला सांगतो दोन महिन्यात आमचे सरकार येणार आहे. अशा पद्धतीने गैरमार्गाने भाजपच्या अनेक नेत्यांना अतिशय कमी दराने देण्यात आलेल्या जमीन व्यवहाराची आम्ही चौकशी करू आणि जमीन हस्तांतरण थांबवू, असेही देशमुख म्हणाले.

हेही वाचा – पेंच व्याघ्रप्रकल्प प्रशासनाविरोधात गावकरी रस्त्यावर

बदलापूर प्रकरणातील आरोपीचा चकमकीत मृत्यू देखील संशयास्पद आहे. हात बांधलेली आणि कधी बंदूक न चालवलेली व्यक्ती पोलिसांच्या हातून बंदूक हिसकावून गोळीबार कशी करू शकते, असा सवालही अनिल देशमुख यांनी केला. गेल्या अडीच वर्षात सरकार म्हणून जे काही चालले आहे. त्यावर जनता प्रचंड नाराज असून जनता भाजपला विधानसभा निवडणुकीत त्यांची जागा दाखवणार आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Case of allotment of land to chandrashekhar bawankule organization bjp targeted mahavikas aghadi leaders rbt 74 ssb