बुलढाणा : शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या काँग्रेस नेते तथा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या संदर्भातील विधानावरून जिल्हा काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली. संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा, अशी मागणी करीत काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शहर पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले. यानंतर सोमवारी रात्री उशिरा पोलिसांनी आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हे दाखल केले. यामुळे शहरात राजकीय तणाव निर्माण झाल्याचे चित्र आहे.
राहुल गांधी यांनी विदेशात जाऊन आरक्षणासंदर्भात केलेल्या वक्तव्याविरोधात बोलताना संजय गायकवाड यांनी सोमवारी प्रक्षोभक विधान केले होते. राहुल गांधी यांची जीभ कापणाऱ्याला ११ लाखांचे बक्षीस देईल, असे त्यांनी जाहीर केले होते.
हे ही वाचा…लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाची माहिती.. महिला व बालविकास मंत्री म्हणाल्या…
संजय गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारे तक्रार निवेदन देण्यासाठी काँग्रेस नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते शहर पोलीस ठाण्यात दाखल झाले. आंदोलनात काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे, माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ, विजय अंभोरे, महिला काँग्रेसच्या जिल्हा अध्यक्ष मंगला पाटील, प्रदेश सचिव जयश्री शेळके, सुनील सपकाळ, रिजवान सौदागर, बुलढाणा शहराध्यक्ष दत्ता काकस, आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने सहभागी झाले होते.
हे ही वाचा…गायकवाड यांना वडेट्टीवार यांचे प्रत्युत्तर ,म्हणाले ‘पन्नास खोके घेणाऱ्यांना सत्तेची मस्ती’
तत्पूर्वी, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड यांनीही बुलढाणा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सर्व काँग्रेस पदाधिकारी यांच्यावतीने तक्रार दाखल करण्यात आली. यात आमदार गायकवाड यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
काँग्रेस नेत्यांच्या तीव्र प्रतिक्रिया
संजय गायकवाड यांच्या विधानावर काँग्रेस नेत्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या. राहुल गांधी यांच्या जिभेपर्यंत काय त्यांच्या पायाच्या नखापर्यंतही संजय गायकवाड यांचे हात पोहोचू शकत नाहीत. गायकवाड यांच्यावर पोलिसांनी तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी केली.
आमदार गायकवाड यांच्या या विधानाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर माफी मागावी. सातत्याने प्रक्षोभक विधाने करणारे आमदार गायकवाड यांनीही माफी मागावी. बुलढाण्यात लोकशाही नसून गुंडशाही आहे, असा आरोप काँग्रेस प्रदेश सचिव जयश्री शेळके यांनी केला.
हे ही वाचा…आरोग्य खात्याचा गलथानपणा, डेंग्यूबाधितांना जमिनीवर झोपवून उपचार
‘गणराया आमदाराला सद्बुद्धी द्या’
आमदार गायकवाड यांना सद्बुद्धी द्या, असे साकडे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी सुवर्ण नगरमधील अष्टविनायक मंदिराला भेट देत गणरायाला घातले. राहुल गांधी कोण आहेत, याचे स्मरण गायकवाड यांना व्हावे, यासाठी त्यांनी ‘शंख पुष्पी’ हे औषध गायकवाड यांना भेट देऊ केले. त्यांचे बरळणे मानसिक दिवाळखोरी आहे, लाखो नागरिकांचे ते दुर्दैव आहे, असे सपकाळ म्हणाले.
हे ही वाचा…आरोग्य खात्याचा गलथानपणा, डेंग्यूबाधितांना जमिनीवर झोपवून उपचार
दखलपात्र गुन्हे दाखल
बुलढाणा शहर पोलिसांनी अखेर सोमवारी रात्री उशिरा आमदार संजय गायकवाड यांच्याविरुद्ध दखलपात्र गुन्हे नोंदवले. यानंतर ठिय्या आंदोलन मागे घेत ‘एफआयआर’ची प्रत घेऊनच काँग्रेस नेते पोलीस ठाण्याच्या बाहेर पडले. काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हा कार्याध्यक्ष समाधान दामधर यांच्या तक्रारीवरून आमदार गायकवाड यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेचे कलम १९२, ३५१(२), ३५२(३), ३५२(४) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले.