नागपूर : भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) तरुण पोलीस अधिकाऱ्याने डॉक्टर असलेल्या तरुणीशी इंस्टाग्रामवरुन मैत्री केली. तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून बलात्कार केला. या प्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरुन इमामवाडा पोलीस ठाण्यात बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.गुन्हा दाखल होताच पोलीस अधिकाऱ्याने पळ काढल्याची माहिती समोर आली आहे. दर्शन (३०, रा. यवतमाळ) असे बलात्कार करणाऱ्या आयपीएस अधिकाऱ्याचे नाव आहे. सध्या तो नंदूरबार जिल्हा पोलीस दलात कार्यरत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी संजना (काल्पनिक नाव) नोव्हेंबर २०२२ मध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेत असताना  दर्शन याची इंस्टाग्रामवरुन ओळख झाली. सुरुवातील काही दिवस दोघेही इंस्टाग्रामवरुन चॅटिंग करीत होते. काही दिवसानंतर दोघांनी एकमेकांचे मोबाईल क्रमांक घेऊन फोनवरुन बोलणे सुरु केले. काही दिवसांतच दोघांची चांगली मैत्री झाली. २०२२ मध्ये दोघांची प्रत्यक्ष भेट झाली.  त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. दरम्यान संजना एका खासगी रुग्णालयात डॉक्टर म्हणून रुजू झाली.

यादरम्यान, दर्शनची आई आजारी पडली. डॉक्टर असलेल्या संजनाने दर्शनच्या आईवर उपचार केले. खासगी रुग्णालयाचे बीलसुद्धा भरले. मात्र, काही दिवसांनंतर दर्शनच्या आईचा मृत्यू झाला. त्यानंतर दर्शनने संजनाला फिरायला केरळमध्ये नेले. तेथे एका हॉटेलमध्ये तिला शारीरिक संबंधाची मागणी केली. मात्र, तिने नकार दिला. त्यामुळे दर्शनने तिला लग्न करण्याचे आमिष दाखवले.  बळजबरीने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर त्याने नागपुरातील इमामवाड्यातील एका हॉटेलमध्ये नेऊन शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

आयपीएसमध्ये निवड होताच दिला लग्नास नकार

दर्शन हा बेरोजगार असताना डॉ. संजनाने त्याला आर्थिक मदत केली. तो केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाला. त्याची आयपीएस अधिकारी म्हणून निवड झाली. हैदराबादला पोलीस अधिकारी प्रशिक्षणासाठी गेला. दरम्यान, संजना हैदराबादला गेली. तेथेही त्याने तिचे लैंगिक शोषण केले. तिने लग्नाचा तगादा लावला असता दर्शनने तिला नकार दिला. तसेच तिला जातिवाचक शिवीगाळ करुन मारहाण केली.

तरुणीने दिली पोलिसात तक्रार आयपीएस अधिकारी दर्शन याने सलग दोन वर्षे लैंगिक शोषण केल्यानंतर लग्नास नकार दिल्यामुळे डॉ. संजना नैराश्यात गेली. तिने दर्शनच्या मावस बहिणीची भेट घेतली आणि लग्नाची बोलणी केली. मात्र, तिनेही तिला शिवीगाळ केली. त्यामुळे चिडलेल्या संजनाने इमामवाडा पोलीस ठाण्यात लैंगिक शोषण केल्याची तक्रार दिली. पोलिसांनी आयपीएस अधिकारी दर्शनवर गुन्हा दाखल केल्याची माहिती इमामवाडा पोलिसांनी दिली.