बुलढाणा : बातमीचे शीर्षक वाचून धक्का बसणार हे नक्की. आता बायकोची ‘ डिलिव्हरी’ अन घरात बाळ होणे ही तर आनंदाची बाब, हौशी कुटुंबासाठी तर जल्लोश साजरा करण्याची संधी.आता काही चाणाक्ष वाचक म्हणतील पुन्हा एकदा मुलगी झाली असेल म्हणून पत्नीला मारहाण किंवा घरातून हाकललं असेल कदाचित म्हणून पती आणि सासरच्या मंडळी विरुद्ध गुन्हा दखल झाला असेल, पण हे ‘मॅटर ‘ तस नाही बरं.
बायकोची प्रसूती झाल्यावर नवऱ्यावर कसं काय गुन्हा दाखल होऊ शकतो? पण या प्रकरणात नवऱ्याने जे केलं ते चुकीचं होत म्हणूनच पोलिसानी त्याच्यावर गुन्हा दाखल केला. हा नवरोबा आता बाप झालेला व्यक्ति आहे २८ वर्षांचा अन् त्याच्या पत्नीचं वय हाय १८ वर्षांपेक्षा कमी!प्रकरण मलकापूर तालुक्यातील दाताळा नजीकच्या पुरपीडी गावातील आहे. संजय सावकारे असे नाव असलेल्या या युवकाने गेल्या वर्षी अल्पवयीन मुली सोबत लग्न केले. आता लग्नानंतर बायको गर्भवती राहिली. तपासणीत आढळले. त्यामुळे प्रारंभी मलकापूर ग्रामीण रुग्णालयात तपासणी नंतर तिला मुलीला प्रसूतीसाठी बुलढाणा येथील महिला रुग्णालयात येथे आणल्यावर तिने बाळाला जन्म दिला. तेंव्हा हा प्रकार उघडकीस आला.
डॉक्टरांनी गर्भवती मुलीचे वय तपासले असता ती अल्पवयीन असल्याचे लक्षात आले. डाक्टरांनी ही माहिती बुलढाणा शहर पोलिसांना दिली. शहर पोलिसांनी अल्पवयीन मुलीच्या नवऱ्यावर बालविवाह करून मुलीला बालमाता करण्यासाठी जबाबदार धरले आहे. तसेच प्रकरण मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्याकडे वर्ग केले.याप्रकरणी मलकापुर ग्रामीण पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४ (१) सहकलम ४, ६, १२ पोक्सो सहकलम ९, ११ बालविवाह प्रतिबंधक अधिनियम नुसार गुन्हे दखल केले.
माता झालेल्या अल्पवयीन पत्नीने फिर्याद दिली. यावरून पती संजय गणेश सावकारे वय २८ वर्ष, सासरे गणेश सावकारे, सासू शोभा गणेश सावकारे (सर्व रा. पुरपिडी पो. दाताळा ता. मलकापुर जि. बुलडाणा) आणि आई अनिता देवी भोलानाथ (रा प्रयागराज उत्तर प्रदेश) यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. तपास सहायक पोलीस निरीक्षक संदिप काळे करीत आहे