यवतमाळ – एका खासगी शाळेत सात वर्ष नोकरी केल्यानंतर शाळा सोडून गेलेल्या शिक्षिकेबाबत संस्थाचालकाने पालकांच्या समूहात अश्लील संदेश टाकून तिचीबदनामी केली. याबाबत जाब विचारणाऱ्या शिक्षिकेच्या पतीला जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी शिक्षिकेच्या तक्रारीवरून लोहारा पोलीस ठाण्यात संस्थाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनेश रामभाऊ पवार , रा. वाघापूर असे संस्थाचालकाचे नाव आहे. या प्रकाराने शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
दिनेश पवार याची लोहारा येथील मातोश्री नगरात सनराईज इंग्लिश मिडियम स्कुल नावाने शाळा आहे. या शाळेत एक शिक्षिका २०१८ पासून अत्यल्प मानधनावर काम करत होती. या शिक्षिकेने नुकताच राजीनामा दिला. त्यामुळे संतापलेल्या संस्था चालकाने शाळेच्या पालकांच्या व्हॉट्सॲप समूहात शिक्षिकेबद्दल अत्यंत घाणेरड्या भाषेत संदेश टाकला. या शिक्षिकेसोबतच अन्य शिक्षिकांचे चारित्र्यहनन पवार याने केले. काही पालकांनी ही बाब शिक्षिकेच्या निदर्शनास आणून दिली. तेव्हा शिक्षिकेच्या पतीने पवार यास फोन करून जाब विचारला. त्यावेळी पवार याने सदर शिक्षिकेच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत तिच्या पतीला जीवे मारण्याची धमकी दिली. पवार याने समाज माध्यमात टाकलेलं संदेश अनेक समूहात प्रसारित झाले. शिवाय शिक्षिकेच्या पतीला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची ऑडीओ क्लिपही सर्वत्र व्हायरल झाली. या प्रकाराने घाबरलेल्या शिक्षिकेने पतीसह लोहारा पोलीस ठाणे गाठून संस्थाचालक दिनेश पवार याच्या विरोधात तक्रार दिली. या प्रकरणी लोहारा पोलिसांनी सनराईज शाळेचा संचालक दिनेश पवार याच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले. या प्रकरामुळे यवतमाळचे शैक्षणिक वातावरण ढवळून निघाले आहे.
या प्रकरणी विविध संघटनांनी दिनेश पवार याचा निषेध नोंदवून पोलिसांनी त्याला तत्काळ अटक करावी अशी मागणी केली आहे. या संदर्भात पोलीस अधिक्षकांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली. तसेच संस्थाचालक पवार याच्या विरोधात अनुसूचित जाती, जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यावेळी ओम तिवारी, नंदु कुडमेथे, अशोक गेडाम, संतोष पारधी, सुनिल बोरकर, आकाश गायकवाड, राहुल मसराम, बबलु देशमुख, लाला तेलगोटे, सुभाष चांदेकर, अर्चना चांदेकर, दिनेश उईके, मनोज गेडाम, राजु चांदेकर, प्रदिप, सुधा लोणारे, पंडीत कांबळे, सुशील रामटेके, महेन्द्र कांबळे उपस्थित होते.