बुलढाणा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत डी. यांच्या विरोधात शेतकऱ्यांनी खंडणी उकळण्याचा खळबळजनक आरोप केला आहे. एका शेतकरी महिलेने शेगाव शहर  पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून डिक्कर यांच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना शेगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

शेगाव शहर पोलीस ठाण्यात आज, शुक्रवारी संध्याकाळी उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील जिगाव या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात गावठाण क्षेत्राकरिता शासनाने शेतकऱ्यांच्या शेती संपादित केली आहे. त्यासाठी मोबदला शेतकऱ्यांना दिला जात आहे. मात्र हा मोबदला प्रति हेक्टर ४० लाख रुपये मिळवून देतो असे सांगून शेतकऱ्यांकडून पाच लाख रुपये उकळल्याचा व आणखी जास्त पैशासाठी प्रशांत डिक्कर हे त्रास देत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला.

आज शेगाव येथील जिगाव प्रकल्पा अंतर्गत शेतकरी व अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये प्रशांत डीक्कर यांना शेतकऱ्यांनी लोटपाट करीत बैठकीतून बाहेर काढल्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळतात  घटनास्थळी पोहोचल्यानंतर प्रशांत डिक्कर यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन शेगाव पोलीस ठाण्यात  आणले. यावेळी शेतकऱ्यांच्या वतीने  संग्रामपूर तालुक्यातील हिंगणा कवठळ या गावाच्या सरपंच पुष्पा संदीप मोरखडे यांनी रीतसर शहर पोलिसात तक्रार नोंदविली. यावरून डिक्कर यांच्या विरोधात  विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

पोलीस स्टेशन शेगाव शहर मध्ये कलम ३०८ (२), ३०८ (३), ३०८ (५) भारतीय न्यास संहिता नुसार गुन्हे दाखल करण्यात आले. फिर्यादी पुष्पा संदिप मोरखडे असून शेती करतात. त्या हिंगणा कवठळ तालुका संग्रामपूर येथील रहिवासी आहेत. आरोपी  प्रशांत काशिराम डिक्कर वय  ग्राम बोडखा तालुका संग्रामपूर येथील रहिवासी आह.

दाखल तक्रारीनुसार अंदाजे आठ दिवस अगोदर  फिर्यादी यांना जिगाव प्रकल्प त्यांची पुनर्वसन होणारी शेतीचे प्रति एकराचे मोबदल्यात शासनाकडून अंदाजे चाळीस लाख रुपये लाभ मिळवून देतो असे आश्वासन डिक्कर यांनी दिले. तसेच मोबदल्यात नगदी स्वरूपात पाच लाख रुपये घेतले. आरोपीने शासनाकडून प्रति एकराचे चाळीस लाख रुपये मिळवून देतो, परंतु मला आता प्रति एकरामागे तुम्हाला पाच लाख रुपये द्यावे लागतील. पैसे दिले नाही तर मी तुमच्या विरोधात शासनाकडे आंदोलन करून तुम्हाला शासनाचा कुठलाही लाभ मिळू देणार नाही अशी धमकी दिली.

फिर्यादी व साक्षीदारांना खंडणी स्वरूपात प्रति एकराप्रमाणे पाच लाख रुपये खंडणीची मागणी करून खंडणी दिली नाही तर माझ्या कार्यकर्त्यांकडून ठार मारून गायब करून टाकीन, अशी धमकी दिली. फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरून सदर गुन्हा नोंद करून तपास  सहायक पोलीस निरीक्षक गजानन सोनटक्के यांच्याकडे देण्यात आला

Story img Loader