लोकसत्ता टीम
यवतमाळ : उमरखेड तालुक्यातील ढाणकी येथे शाळेतून घरी परतणाऱ्या विद्यर्थिनीस अश्लील इशारे करून खुणावणाऱ्या एका तरुणाविरुद्ध विनयभंगासह पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तत्परता दाखवत या विकृत तरूणास अटक केली. करण रोहिदास जाधव (२३), रा. मेट, ता. उमरखेड असे या तरूणाचे नाव आहे.
बिटरगाव पोलिस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या ढाणकीत एक अल्पवयीन पीडित फिर्यादी मुलगी ही बाराव्या वर्गात शिकत आहे. ८ ऑगस्ट रोजी सायंकाळी शाळा सुटल्यानंतर पीडिता घरी जात होती. जात असताना टेंभेश्वरनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर गोविंद काशिनाथ मिटकरे यांचे शेताजवळ एक अनोळखी तरूण झुडपामध्ये कपडे काढून तिच्याकडे बघून घाणेरडे इशारे करत असल्याचे तिला दिसले. या प्रकाराने ती घाबरली आणि तेथून पळाली व घरी जाऊन आई-वडिलांना घडलेला प्रकार सांगितला.
आणखी वाचा-अमरावतीत रक्तरंजित संघर्ष, सूड उगवण्यासाठी युवकाची हत्या
घरच्यांनी त्या इसमाचा शोध घेतला परंतु तो सापडला नाही. त्यानंतर १० ऑगस्ट रोजी शाळा सुटल्यानंतर पीडित विद्यार्थिनी आपल्या मैत्रिणीसोबत घरी जात असताना तो तरूण त्याच शेताजवळ घाणेरडे इशारे करून मुलींना खुणावत होता. पीडितेने घरी जावून आई वडिलांना हा प्रकार सांगितला. तेव्हा पीडितेच्या आई-वडिलांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी मुलीस सोबत घेवून टेंभेश्वरनगर रस्यानावर शोध घेतला तेव्हा एक संशयित इसम दिसला.
पीडित विद्यार्थिनीकडून हा तोच तरूण असल्याची खात्री केल्यानंतर पोलिसांनी त्याला तत्काळ ताब्यात घेतले. याप्रकरणी विनयंभागसह विविध कलमांसह बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअन्वये गुन्हा नोंदवून तरूणास अटक करण्यात आली.
आणखी वाचा-विधी क्षेत्रातील दिग्गज शनिवारी बुलढाण्यात!
अनेक शाळा, महाविद्यालयांमध्ये विद्यार्थिनींच्या सुरक्षेचया दृष्टीने उपाययोजना नसल्याने पालकांनी संताप व्यक्त केला आहे. शहरी भागातील काही मोजके शाळा, महाविद्यालय वगळल्यास अनेक शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. बदलापूर घटनेनंतर शासनाने सीसीटीव्ही, कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी आदी आदेश दिले आहे. मात्र विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे देणे गरजेचे असल्याचे मत पालकांनी व्यक्त केले आहे.
विद्यार्थ्यांकडे शाळेचे दुर्लक्ष
अनेकदा विद्यार्थ्यांकडे शाळेचे दुर्लक्ष होत असल्यानेही दुर्घटना घडत आहे. महागाव तालुक्यात १५ दिवसांपूर्वी ट्रकने शौचालयास धडक दिली. त्याखाली दबून तिसऱ्या वर्गातील विद्यार्थिंनी ठार झाली. मात्र, शाळेतील विद्यार्थिनी अचानक बेपत्ता होवूनही शिक्षकांनी त्याकडे लक्ष न दिल्याने विद्यार्थिनीचा जीव गेला. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत प्रत्येक शिक्षकावर जबाबदारी निश्चित करण्याची मागणी पुढे आली आहे.