बुलढाणा : शेगाव तालुक्यातील आकस्मिक केसगळती आणि टक्कलचे रुग्ण आज सोमवारी पुन्हा वाढलेत. आज सहा रुग्णांची भर पडली असून या अनामिक आणि विचित्र आजाराची तालुक्यातील रुग्णसंख्या आजअखेर १४९ इतकी झाली आहे. दरम्यान, नांदुरा तालुक्याला आज नागपूर येथील तज्ज्ञ चमुने भेट दिली. यामुळे दोन्ही तालुक्यांतील हजारो गावकऱ्यांची भीती आजही कायम असल्याचे दुर्देवी चित्र आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शेगाव तालुक्यात आज करण्यात आलेल्या सर्वेक्षणात केसगळतीचे आणखी सहा रुग्ण आढळून आले. बोंडगाव, कठोरा या बाधित गावांत प्रत्येकी दोन, तर मच्छिन्द्रखेड आणि माटरगाव बुद्रुक या बाधित गावांत प्रत्येकी एकेक रुग्ण वाढले आहे. आरोग्य यंत्रणेच्या वरिष्ठ सूत्रांनी आज संध्याकाळी उशिरा ‘लोकसत्ता’सोबत बोलताना याला दुजोरा दिला. यामुळे शेगाव तालुक्यातील रुग्णसंख्या १४९ वर पोहोचली.

हेही वाचा…बुलढाणा : आई बाहेर, चिमुकला गॅलरीत ‌‌अन् ‘फ्लॅट’चे दार ‘लॉक’…

नांदुरामधील आकडा स्थिर

नांदुरा तालुक्यातील वाडी गावात ३ घरांमध्ये केसगळतीचे ७ रुग्ण आढळून आले होते. तेथील रुग्णसंख्या स्थिर असल्याचे सूत्रांनी सांगितले. आज नागपूर येथील होमिओपॅथी आयुर्वेदिक व युनानी डॉक्टरांच्या चमुने वाडी गावाला भेट देऊन नागरिकांची तपासणी केली. नागपूर येथील सहाय्यक संचालक अनुसंधान परिक्षण नागपूरची ही चमू आहे. संस्थेने आज नांदुरा तालुक्यातील वाडी येथील गावाला भेट दिली.

भयाची व्याप्ती वाढली

शेगाव तालुक्यात ठाण मांडून बसलेल्या आकस्मिक केसगळती आणि टक्कल या अनामिक आजाराचा प्रसार किंबहुना प्रादुर्भाव वाढायला नको म्हणून चमुने ही भेट दिली. यामध्ये नागपूरचे डॉ. मिलिंद सूर्यवंशी, डॉ. शेखर, डॉ. कमलेश भंडारी (उपसंचालक अकोला), डॉ. दिपाली भायेकर (उपसंचालक अकोला) यांच्यासोबत इतरही वरिष्ठ आरोग्यतज्ज्ञ यांचा पथकात समावेश होता. चमुने वाडी गावाची माहिती समजून घेत काही औषधी या गावात पाठवीत असल्याचे सांगितले. तसेच आयसीएमआर चेन्नई येथील चमूसुद्धा वाडी या गावाला भेट देऊन पाहणी करणार आहे. या विचित्र तथा भीतीदायक आजाराने नांदुरा तालुक्यात शिरकाव करून भयाची व्याप्ती वाढविली आहे.

हेही वाचा…ऐन हिवाळ्यात विजेची विक्रमी मागणी…असे काही घडले की ज्यामुळे…

आरोग्य यंत्रणा हादरल्या

नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलजी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या वाडी या गावात केसगळतीचे सात संशयित रुग्ण आढळून आल्याने नांदुरा तालुका आरोग्य यंत्रणा हादरल्या आहेत. यावेळी नांदुरा आरोग्य अधिकारी नेहा पाटील जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. प्रशांत तांगडे, जिल्हा आरोग्य अधिकारी व नांदुरा तालुक्यातील आरोग्य अधिकारी उपस्थित होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cases of sudden hair loss in shegaon taluka increased again today monday scm 61 sud 02