अकोला : शहरातील सायकल विक्रीच्या दुकानात तब्बल एक कोटी १५ लाख रुपयांच्या रोख रक्कमेचे घबाड आढळून आले आहे. खदान पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिसांनी छापा टाकून रक्कम जप्त केली. ही रक्कम नेमकी कोणाची व कशासाठी आणल्या गेली होती, हे स्पष्ट झाले नाही. याची माहिती नागपूर प्राप्तिकर विभागाला देण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक मनोज केदारे यांनी दिली.
शहरातील गोरक्षणा मार्गावरील न्यू शर्मा ब्रदर्स सायकल व फिटनेस सामान विक्रीच्या दुकानात मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय चलनामधील नगदी रोख रक्कम अवैधरित्या आणून ठेवल्याची गोपनीय माहिती खदान पोलिसांना मिळाली. या माहितीवरून खदान पोलिसांच्या पथकाने पंचासह न्यू शर्मा ब्रदर्स सायकल विक्रीच्या दुकानात छापा टाकला.
दुकानामध्ये कॉउंटरवर दीपक दिनकर घुगे (वय ३० वर्ष, रा. ग्राम खिर्डा ता. मालेगाव, जि. वाशीम) हा उपस्थित होता. त्याच्या जवळ दोन पांढऱ्या रंगाच्या कापडी पिशव्यांमध्ये भारतीय चलनातील ५०० रुपयांच्या प्रत्येकी १०० नोटांचे पाच असे अडीच लाख रुपयांचे एकूण ४६ बंड्डल आढळून आले. ही एकूण एक करोड १५ लाख रुपयांची रोख रक्कम आढळून आली. या रोख रकमेसंदर्भात संबंधिताला मालकी हक्काच्या कागदपत्रांची विचारणा करण्यात आली.
त्याने रोख रकमेसंदर्भात कोणताही मालकी हक्क किंवा दस्तऐवज सादर न करता उडवाउडवीचे व असमाधानकारक उत्तरे पोलीस पथकाला दिले. त्यामुळे पोलीस पथकाने घटनास्थळी पंचासमक्ष रोख रक्कम जप्त करून कायदेशीर कारवाई करण्यात आली. या कारवाईची माहिती नागपूर प्राप्तिकर विभागाच्या मुख्य आयुक्तांना देण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, शहर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुळकर्णी यांच्या मार्गदर्शनात खदान पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोज केदारे, सहा. पोउपनि दिनकर धुरंधर, पोहवा निलेश खंडारे, पोकॉ विकांत अंभोरे व पो. कॉ रवी काटकर आदींच्या पथकाने केली आहे.
गोरक्षण मार्गावरील सायकल विक्रीच्या दुकानात मोठ्या प्रमाणात रोख रक्कम अवैधरित्या ठेवण्यात आल्याची माहिती मिळाली होती. त्या ठिकाणी छापा टाकून एक कोटी १५ लाखाची रोख रक्कम जप्त करण्यात आली. संबंधिताला या रकमेच्या मालकी हक्काबाबत पुरावे देता आले नाही. प्राप्तिकर विभागाला याची माहिती दिल्याचे पोलीस निरीक्षक मनोज केदारे यांनी सांगितले.