कितीही प्रयत्न केला तरी मनातून जात नाही ती जात! असे गंमतीने म्हटले जाते. या खऱ्या वाक्याचा परिचय समाजात वावरताना वारंवार येत असतो. अगदी काल परवाच्याच घटना बघा. केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर झाला. संपूर्ण देशात या आयोगाच्या परीक्षा उच्च काठीण्य पातळीच्या म्हणून ओळखल्या जातात. त्यामुळे यात यश मिळवणाऱ्यांचे अभिनंदनही जोरदार होते. हा निकाल जाहीर झाला आणि त्यातील गुणवंतांचे चेहरे समाजमाध्यमांवर झळकू लागले. गुणवंतांचे अभिनंदन करणाऱ्या या जाहिरातीतील ‘काही’ विशिष्ट जाती समूहाच्या होत्या. मग दुसऱ्या दिवशीपासून तर या गुणवंतांना आपापल्या जातीत वाटून घेण्यासाठी जणू स्पर्धाच सुरू झाली. यामुळे एखाद्या गुणवंताने यश कसे मिळवले अथवा त्याच्या यशाचे गमक काय हे जाणून घेण्यात उत्सुकता असणाऱ्यांना आधी त्याची जातच ठाऊक झाली. या जाहिरातीतील मजकूरही चीड आणणारा होता. एवढे मोठे यश मिळवल्याबद्दल समस्त जातीला तुझा अभिमान आहे असे अनेक ठिकाणी नमूद होते. अभ्यास विद्यार्थ्यांने केला आणि अभिमान जातीला आहे हे अजब तर्कट यातून दिसून आले. मूळात आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी विविध प्रशासकीय सेवांमध्ये जातात. लोकांची सेवा करताना जात, पात, धर्म पाळू नये, पुढय़ात येणारा प्रत्येक गरजू हा देशाचा नागरिक आहे याच दृष्टीने त्याकडे बघून काम करावे अशी अपेक्षा या गुणवंतांकडून केली जाते. आपल्या जातीचा म्हणून त्याला झुकते माप द्यायचे हे या विद्यार्थ्यांकडून अपेक्षितच नसते. त्यांनाच उत्तीर्ण झाल्याबरोबर जातीची आठवण करून देण्याचे पातक आपण किती काळ करत राहणार हा प्रश्न अस्वस्थ करणारा आहे. हे जातीचे भूत एवढय़ावरच थांबत नाही. मध्यंतरी मूळच्या मध्यप्रदेशच्या पण महाराष्ट्र कॅडर मिळालेल्या एक महिला पोलीस अधिकारी विदर्भात एका जिल्ह्य़ात रूजू झाल्या. काही उत्साही जातीवंतांनी त्यांची जात शोधली व अभिनंदनाचे फलक समाजमाध्यमांवर झळकवले. त्यामुळे त्या कोणत्या जातीच्या याचा उलगडा अनेकांना झाला. या वादग्रस्त जाहिरातीवर या महिला अधिकाऱ्याने आक्षेप घेतला की नाही हे कळले नाही पण असा जात शोधण्याचा उत्साह दाखवणाऱ्यांची संख्या वाढते आहे ही चिंतेची बाब आहेच. आयोगाच्या माध्यमातून शासकीय सेवेत येणाऱ्या अधिकाऱ्यांना मुद्दाम वेगवेगळ्या राज्यात पाठवले जाते. त्यांनी निष्पक्षपणे काम करावे हेही एक कारण त्यामागे असते. त्याला सुरुंग लावण्याचे तसेच या गुणवंतांच्या डोक्यात जातीचे भूत शिरवण्याचे प्रकार उबग आणणारे आहेत. गेल्याच आठवडय़ात बारावीचा निकाल लागला. तिथेही गुणवंतांचे कौतुक करताना त्यांना जातीच्या चौकटीत बांधण्याचा प्रकार सर्रास बघायला मिळाला. हे जातीचे कौतुक केवळ समाजमाध्यमांपुरते मर्यादित नसते. दरवर्षी विविध जाती, धर्माचे मेळावे ठिकठिकाणी होत असतात. तिथेही या गुणवंतांना सत्कारासाठी बोलावले जाते. अनेकदा घरातले लोकच या गुणवंतांवर अशा कार्यक्रमाला जाण्यासाठी दबाव आणतात हा अनुभव सार्वत्रिक आहे. एखाद्याने नाही म्हटले तर कुटुंबातील मुलींच्या लग्नाचा हवाला दिला जातो. जातीत सक्रिय नसले तर लग्नासाठी अडचणी येतात असे सांगितले जाते. जात ही जन्मापासून प्रत्येकाला चिकटते. नंतर शिक्षणातही ती आपला पाठलाग करत राहते हे मान्य. शिक्षण घेताना प्रत्येक टप्प्यावर या जातीचा उल्लेख येतो आणि आठवण नकोशी झाली असली तरी ती अपरिहार्यपणे काढावी लागते हे खरे. तरीही शिक्षणाव्यतिरिक्त मी जातीचा विचार करणार नाही असा उन्नत विचार एखाद्याने करतो म्हटले तरी त्याला समाजातले जातीवंत पुन्हा त्याच गावगाडय़ात आणून ठेवतात. हे जातीत वाटून घेण्याचे प्रकरण त्यातले आहे. एकदा नोकरी स्वीकारल्यावर सर्वाच्या कल्याणासाठी कटिबद्ध अशी भूमिका एखाद्या गुणवंताने घेतो म्हटले तरी त्याला जाणीवपूर्वक जातीच्या कुंपणाला बांधणारे असतात. जातीवंतांच्या या उदोउदोमुळे केंद्र किंवा राज्य आयोगाच्या परीक्षा उत्तीर्ण होऊन सेवेत आलेले अनेक अधिकारी जातिवंतांना सुद्धा लाजवतील असे वागताना दिसतात. विदर्भात अशी अनेक उदाहरणे आहेत. प्रशासनात काम करणारे हे अधिकारी अगदी उघडपणे जातीच्या मेळाव्यांना हजेरी लावतात. जातीच्या लोकांची कामे प्राधान्याने करताना दिसतात. मेळाव्यात बोलताना जातीतले आणखी गुणवंत सेवेत आले पाहिजे असे व्याख्यान देतानाच जातीशी इमान राखण्याचा सल्ला पण देऊन टाकतात. अनेक वर्षे विदर्भात राहिलेला एक अधिकारी तर या जातीप्रेमापोटी प्रचंड बदनाम झाला व शेवटी पदावनत सुद्धा झाला. प्रशासनच जर असे जातीकडे झुकू लागले तर जे तळातले आहेत किंवा ज्यांचा कुणी प्रशासनात नाही त्यांनी कुणाकडे अपेक्षेने बघायचे असा प्रश्न मग साहजिकच समोर येतो. जातीच्या मेळाव्यांना हजेरी लावणे ही राजकारण्यांची गरज बनली आहे. मतांच्या राजकारणासाठी त्यांना अशा व्यासपीठावर जावे लागते पण त्याचे अनुकरण अधिकारी करू लागले की प्रशासनाचा तोलच बिघडतो. प्रशासन ही न्याय देणारी यंत्रणा आहे. तीच एका बाजूला झुकू लागली की निष्पक्षतेचे गणितच कोलमडून पडते. हे का घडते त्याचे कारण या गुणवंताच्या डोक्यात आरंभापासून जात टाकण्यामागे दडले आहे. त्यामुळेच समाजमाध्यमांवरचा हा जातचौकट कार्यक्रम अस्वस्थ करणारा आहे. एकूण व्यवस्थेतच जातीला कमालीचे महत्त्व आले आहे. प्रत्येक टप्प्यावर ती समोर येतेच. अगदी प्रशासनात सुद्धा! त्यामुळे विसरतो म्हटले तरी विसरता येत नाही हे काहींचे अनुभव खरे असले तरी समाज आणखी उन्नत करायचा असेल तर किमान नव्या पिढीला तरी त्यापासून दूर कसे ठेवता येईल यावर विचार करायला काय हरकत आहे?
– देवेंद्र गावंडे
devendra.gawande@expressindia.com